हुकूमशाहीकडे जाणारा देश वाचविण्याची जबाबदारी नागरिकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:18 AM2018-12-02T00:18:47+5:302018-12-02T00:19:13+5:30

देशातील संविधानिक संस्था नष्ट करून या देशात हुकुमशाही राजवट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या चार वर्षात केंद्रीय नियोजन आयोग बरखास्त करण्यात आला. तसेच जागतिक पातळीवरील अलीप्त राष्ट्र परिषदेतून भारत बाहेर पडला.

 Citizens' responsibility to save the country going to dictatorship | हुकूमशाहीकडे जाणारा देश वाचविण्याची जबाबदारी नागरिकांची

हुकूमशाहीकडे जाणारा देश वाचविण्याची जबाबदारी नागरिकांची

Next
ठळक मुद्देकुमार केतकर : ‘गांधी समजून घेताना’वर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील संविधानिक संस्था नष्ट करून या देशात हुकुमशाही राजवट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या चार वर्षात केंद्रीय नियोजन आयोग बरखास्त करण्यात आला. तसेच जागतिक पातळीवरील अलीप्त राष्ट्र परिषदेतून भारत बाहेर पडला. २०१९ नंतर जर पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत, तर या देशात नथ्थुराम गोडसेंना राष्ट्रपिता म्हणून गौरविल्या जाईल, अशी भीती ज्येष्ठ संपादक व राज्यसभा सदस्य खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केली.
गांधी फॉर फ्युचर व सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी समजून घेताना’ या विषयावर गांधी विचार व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष म्हणून प्रियदर्शनी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंभा सोनाये होत्या. यावेळी चरखा, खादीची शाल व सूतमाळ देवून खा. केतकर त्यांचा स्वागताध्यक्षांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित फाळके पाटील यांनी केले. यात त्यांनी आपण कारंजासारख्या लहानश्या गावातून शिक्षण घेवून देश-विदेशात विविध ठिकाणी फिरलो. अनेक लोकांशी संवाद साधला. परंतु, कुठेतरी नंतर आपल्याला गावाकडे परतण्याची इच्छा निर्माण झाली. यामागे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रेरणा व विचार कारणीभूत होते, असे त्यांनी सांगितले.
व्याख्यानात खा. कुमार केतकर म्हणाले, गांधी समजून घेण्याची गरज जगापेक्षा भारताला अधिक निर्माण झाली आहे. कारण गांधी समजून घेवून जगातील विविध देश विकासाकडे पुढे जात आहे. आपल्या देशात आजही नथ्थुराम गोडसेंच्या विचारांचे गुणगाण गाणारे लोक कायम आहे. महात्मा गांधी यांचा मृत्यू होवून ७० वर्षे झालीत. परंतु, अजूनही या महात्म्याची भीती सत्ताधारी पक्षासह गांधी विरोधकांमध्ये कायम आहे. त्यामुळे ते नेहमी सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख करून गांधींची आठवण करीत असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इंग्रजांनाही प्रचंड भीती होती. नि:शस्त्र असलेला हा माणूस इंग्रजांना तेव्हाही भारी पडला होता. जगातील ५६ ठिकाणी इंग्रजांची राजवट होती. मात्र, तेथे होणारे लढे हे शस्त्राने व्हायचे, ते परतुन लावण्याची ताकत त्यांच्यामध्ये होती; पण भारतातील गांधींच्या नेतृत्वातील लढे हे नि:शस्त्र असल्याने इंग्रज गोंधळून जायचे, असे त्यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू यांच्याशी गांधीजींचे अनेक मुद्यांवर मतभेद असले तरी त्यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय गांधींनीच घेतला होता, असा दावाही केतकरांनी केला. आगामी काळात भारतात निवडणुकांमध्ये कोणता पक्ष, कोणते सरकार येईल हे सांगणे कठीण असले तरी या देशात हुकुमशाही राजवट निर्माण होवू शकते, त्यामुळे नागरिकांनी सजग राहून मतदान करण्याची गरज आहे, असे खा. केतकर यावेळी म्हणाले. महात्मा गांधी हयात असताना त्यांची टिंगल-टवाळी तेव्हाही झाली होती. आज सोशल मिडियावर ती केली जात आहे. ही नवी गोष्टी नाही, असेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले तर आभार मुरलीधर बेलखोडे यांनी मानले. कार्यक्रमाला सुमन बंग, डॉ. उल्हास जाजू, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, ज्ञानेश वाकुडकर, प्रशांत देशमुख, भूमीपुत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, प्रवीण काटकर, रितेश घोगरे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, मनोज चांदुरकर, प्रा. किशोर वानखेडे, डॉ. सचिन पावडे, रवी बालपांडे, नितीन झाडे, गंगाधर मुटे, तुषार पेंढारकर, पंकज वंजारे, अमोल देशमुख, मोहित सहारे, यांच्यासह शहरातील गणमान्य व्यक्तीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title:  Citizens' responsibility to save the country going to dictatorship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.