‘कब्रस्तान’च्या जागेसाठी प्रतिकात्मक ‘मुर्दा आंदोलन’, प्रशासनाचा निषेध नोंदवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 03:42 PM2022-04-12T15:42:38+5:302022-04-13T11:07:43+5:30
नागरिकांनी प्रतिकात्मक ‘मुर्दा आंदोलन’ करून रिकाम्या खुर्चीला निवेदन चिकटवले.
वर्धा : खरांगणा (गोडे) गावात कब्रस्तान निर्माणासाठी जागा मिळत नसल्याने तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात निषेध नोंदवून युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या नेतृत्वात नागरिकांनी प्रतिकात्मक ‘मुर्दा आंदोलन’ करून रिकाम्या खुर्चीला निवेदन चिकटवले.
मागील अनेक वर्षांपासून खरांगणा गोडे गावात कब्रस्तानच्या निर्माणासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. कब्रस्तान निर्माणासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला असता, लवकरच जागा देऊ, असे पोकळ आश्वासन देण्यात आले. १८ जून २०२१ तसेच २६ जुलै २०२१ मध्येही गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले.
इतकेच नव्हे तर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेशीही पत्रव्यवहार केला. मात्र, कुणीही या गंभीर समस्येची दखल घेतली नाही. अखेर प्रशासनाच्या दिरंगाईपणामुळे त्रस्त होत, युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात खरांगणा गोडे येथील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर प्रतिकात्मक मुर्दा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेढले.
निवेदन देताना युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रीतेश इंगळे, दिनेश परचाके आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
दफनविधी करावा तरी कुठे साहेब..?
गावात मुस्लीम बांधवांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कब्रस्तान नसल्याने मागील अनेक वर्षांपासून यातना सहन करावी लागत आहे. कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदने दिली. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही मृतदेह नेऊ तरी कुठे, असा प्रश्न आता मुस्लीम समाजाचे बांधव विचारू लागले आहेत.