परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात नागरिकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 05:00 AM2020-12-19T05:00:00+5:302020-12-19T05:00:02+5:30
प्रशासकीय भवनात १० ते १५ विविध शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये शहरातूनच नव्हेतर जिल्ह्यातील विविध गावांतून नागरिक कामानिमित्त येतात. मात्र, प्रवेशद्वारावर कुठल्याही प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आलेले नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी उपप्रादेशिक कार्यालयात वाहनांचा परवाना आणि परवान्यासाठी परीक्षा देण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील प्रशासकीय भवनात विविध शासकीय कार्यालयांत नागरिक येतात. त्यामुळे या कार्यालयात मोठी गर्दी असते. तळमजल्यावर असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या आवारात वाहनांच्या परवान्यासाठी मोठी झुंबड उसळली होती. अनेकजण विनामास्क मुक्तसंचार करताना दिसले तर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देत योग्य उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात येत आहे.
प्रशासकीय भवनात १० ते १५ विविध शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये शहरातूनच नव्हेतर जिल्ह्यातील विविध गावांतून नागरिक कामानिमित्त येतात. मात्र, प्रवेशद्वारावर कुठल्याही प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आलेले नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी उपप्रादेशिक कार्यालयात वाहनांचा परवाना आणि परवान्यासाठी परीक्षा देण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अनेक बाकांवर नागरिक विनामास्क बसून असलेले दिसून आले. तर अनेकांनी प्रवेशद्वारासमोरील हॉलमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नसून ही बाब कोरोनाला आमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देत योग्य उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका
दिवाळीपूर्वी कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत काही अंशी घट झाली होती. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा आलेखात चढ-उतार आहे. मात्र, प्रशासकीय भवनात उसळणाऱ्या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाची लाट उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सॅनिटायझर, थर्मल गन अजूनही बेपत्ताच
कोरानाचा वाढता फैलाव बघता प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझर आणि तामपान मोजण्यासाठी थर्मलगन असणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशद्वारासमोरच सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, प्रशासकीय भवनात येणाऱे सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत असून सॅनिटायझर आणि थर्मलगन बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे.