नागरिकांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:44 PM2018-03-18T23:44:37+5:302018-03-18T23:44:37+5:30
अल्प प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका आतापासूनच जाणवायला लागला आहे. रसुलाबाद येथे पाणी टंचाईने डोके वर काढले असून येथील हातपंप केव्हाचेच कोरडे पडले आहेत.
ऑनलाईन लोकमत
रसुलाबाद : अल्प प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका आतापासूनच जाणवायला लागला आहे. रसुलाबाद येथे पाणी टंचाईने डोके वर काढले असून येथील हातपंप केव्हाचेच कोरडे पडले आहेत. यातच गावाला पाणी पुरविण्याकरिता असलेली सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची विहिरीनेही तळ गाठला आहे. यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभापासूनच गावात पाण्याकरिता भटकंती सुरू झाल्याचे चित्र आहे.
गावात असलेले हातपंप चार महिन्यापूर्वीच आटले. यामुळे संपूर्ण गावाचा डोलारा एकमेव सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवर आला. यातही ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा करणारी विहीर सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा पैसे भरा नळ कनेक्शन घ्या असा नारा दिला. गत तीन महिन्यांपासून नळ जोडण्या वाटपचा सपाटा सुरू केला. आता नळ जोडण्या घेतलेल्यांनी सार्वजनिक नळाचा पाणी पुरवठा बंद करून स्टँड तोडून टाकली. त्यामुळे ज्यांचे घरी नळ नाही अशा नागरिकांवर पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ आली.
पाणी पुरवठ्याच्या विहिरीने आता तळ गाठल्याने घरोघरी पोहोचलेल्या नळांना कसे पाणी पोहोचणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पाण्याकरिता मार्चच्या मध्यातच भांडणे सुरू झाली आहे. या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता गावातील नागरिकांकडे असलेल्या विंधन विहिरी किंवा आसपासच्या परिसरात असलेल्य विहिरी अधिग्रहण करण्याचा अधिकार यापूर्वीच ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या आहे. परंतु असे न काता उलट गावाला दुष्काळ मुक्त दाखविण्याचा प्रयत्न येथे सुरू आहे. बस स्टॉप परिसरातील अलोने यांच्या घराजवळील नळाच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह काढल्याने प्रेशर अभावी या परिसरातील नागरिकांच्या घरी नळाला दहा, पंधरा दिवस लोटूनही पाण्याचा थेंब दिसत नाही.
राष्ट्रीय पेयजल अंतर्गत येथे मंजूर नवीन विहीर, पाईपलाईन पाण्याचे टाकीचे काम नुकतेच चालू झाले आहे. अपूर्ण कामामुळे त्या विहिरीचे पाणी सुद्धा गावाला मिळणे शक्य नाही. परंतु ग्रामपंचायत मात्र आम्ही लवकरच हे पाणी गावात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत आहे. तर काही राजकीय कार्यकर्ते स्वार्थासाठी गावातील पाणी प्रश्नाला मार्गी लावण्याकडे लक्ष देण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.
गावात निर्माण झालेल्या या पाणी टंचाईचे संबंधीत ग्राम सचिवांना विचारणा केली असता पाईप लाईनचा व्हॉल्व्ह लवकरच बसवून पर्यायी व्यवस्था देण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. वास्तवात तसे काही नसल्याने नागरिकांची भटकंती आहे.
नव्या विहिरीतही पाणी नाही
गावात पाणी पुरवठा करण्याकरिता नवीन विहीर आणि नवी योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. मात्र पाईपलाईन टाकण्याचे काम अर्धवट असल्याने या उन्हाळ्यात त्या विहिरीचा लाभ होईल असे चित्र गावात दिसत नाही. यातही येथील लोकव्रतिनिधी गावात पाणी टंचाई नसल्याचे भासवत आहे. वास्तवात गावात पाण्याकरिता नागरिकांत भांडणे होत असल्याचे चित्र आहे. याकडे संबंधीत विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.