सेवाग्रामात आकारास येतेय शहरपक्ष्याचे शिल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:00 AM2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:11+5:30
वर्धा शहराच्या प्रवेशद्वारावर व शहरात नीलपंख पक्ष्याचे शिल्प उभारल्या जाणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केली. या कामाचा समावेश सेवाग्राम विकास आराखडयांतर्गत करण्यात आलेला आहे. सेवाग्राम-वर्धा मार्गावरील एमआयडीसी परिसरातील कारखान्यात स्कॅ्रप मेटल साहित्यातून वर्धानगरीचा शहरपक्षी भारतीय नीलपंखाचेही शिल्प साकारले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सेवाग्रामात राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्यासोबतच वर्धानगरीचा शहरपक्षी भारतीय नीलपंखाचे शिल्प स्कॅ्रप मेटलमधून आकारास येत आहे. वर्धा नगरीच्या प्रवेशद्वारावर या पक्ष्याचे शिल्प उभारले जाणार आहे.
दोन वर्षांपूर्वी शहरात वर्धानगरीचा शहरपक्षी ठरविण्याकरिता निवडणूक आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रात ही निवडणूक गाजली. या निवडणुकीत भारतीय नीलपंख हा पक्षी सर्वाधिक मतांनी निवडून आला. या शहरपक्षाचे शिल्प वर्धानगरीत उभारले जावे याकरिता बहार नेचर फाऊंडेशनसोबतच ‘लोकमत’ने वृत्तमालिकांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. बहारच्या या मागणीला अखेरीस यश आले. वर्धा शहराच्या प्रवेशद्वारावर व शहरात नीलपंख पक्ष्याचे शिल्प उभारल्या जाणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केली. या कामाचा समावेश सेवाग्राम विकास आराखडयांतर्गत करण्यात आलेला आहे. सेवाग्राम-वर्धा मार्गावरील एमआयडीसी परिसरातील कारखान्यात स्कॅ्रप मेटल साहित्यातून वर्धानगरीचा शहरपक्षी भारतीय नीलपंखाचेही शिल्प साकारले जात आहे. या कामात मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी, प्राध्यापक परिश्रम घेत आहेत. पक्ष्याच्या निर्मितीसाठी तज्ज्ञ समितीत सर जे.जे. कला महाविद्यालय, मुंबईचे अधिष्ठाता प्रा. विजय साबळे, कलासंचालक महाराष्ट्र राज्य सचिव राजीव मिश्रा, अधिव्याख्याता प्रा. विजय सकपाळ, प्रा. विजय बोंदर, प्रा. शशिकांत काकडे आदींचा समावेश आहे. विद्यार्थी स्वप्नील जगताप, प्रकाश गायकवाड, सीबी सॅम्युअल, सुहास भिवनकर, अंबादास पैघन परिश्रम घेत आहेत.
सध्या शिल्पाचे काम निम्मे झालेले आहे. पक्ष्याची उंची १३ फूट, रुंदी ३० फूट तर वजन ४ ते ५ टन आहे. याकरिता ४ ते ५ टन भंगार साहित्याचा वापर केला जात आहे. आगामी काही महिन्यात या सर्वच शिल्पांचे काम पूर्णत्वास जाईल, असे सांगितले जात आहे. ५ ते १२ नोव्हेंबर या दरम्यान राज्यभरात पक्षी सप्ताह साजरा करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर शहरपक्षी नीलपंखाचे शिल्प आगामी पक्षी सप्ताहापर्यंत उभारण्याची मागणीही बहार नेचर फाऊंडेशनने जिल्हा प्रशासनाला केली आहे. भंगार साहित्यातून निर्मित हे शिल्प वर्धा-नागपूर मार्गावरील दत्तपूर वळणमार्गाच्या डाव्या बाजूला उभारले जाणार आहे. फाऊंडेशनचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. असून प्रवाशांना खुणावणारे आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरणार आहे.
२० सप्टेंबरपर्यंत जाणार पूर्णत्वास
नीलपंख पक्षी २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि ३० सप्टेंबर रोजी ठरलेल्या ठिकाणी शिल्प उभारण्यात येणार आहे. यासोबतच ‘वेल कल टू वर्धा’ ही दोन टन वजनाची स्वागत अक्षरेही लावण्यात येणार आहेत. मोठया परिश्रमातून हे सुरेख शिल्प साकारले जात असून ऐतिहासिक भूमीत महत्त्वाचे ठरणार आहे.