शहरी ग्राहकांना बसणार फटका
By Admin | Published: June 13, 2017 01:09 AM2017-06-13T01:09:22+5:302017-06-13T01:09:22+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रविवारी मंत्री गटाची सुकाणू समिती व शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊन शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले.
दुधाचे भाव वाढणार : गोरस भंडारसह चिल्लर विक्रेत्यांकडे नजर
श्रेया केने । लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रविवारी मंत्री गटाची सुकाणू समिती व शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊन शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी दोन दिवसांत दुधाचे दर वाढविण्याचे आश्वासन सरकारच्यावतीने देण्यात आले आहे. याचा थेट परिणाम वर्धा जिल्ह्यातील दुध उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे.
वर्धा जिल्ह्यात अनेक गावांमध्ये शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून केला जातो. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात दुधाचे उत्पादन ३० ते ४० हजार लीटरच्या घरात आहे. पूर्वी अनेक गावांत सहकारी तत्वावर दूध उत्पादक सहकारी संस्था दुधाचे संकलन करून ते दूध वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघाला देत होत्या. शेतकऱ्यांकडून दररोज संकलीत केल्या जाणाऱ्या या दुधाची वाहतूक करून हे दूध वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सेवाग्राम मार्गावरील प्रक्रिया केंद्रात आणले जात होते. त्या मोबदल्यात दूध सोसायट्या व शेतकऱ्यांना ७ ते १५ दिवसांच्या आत चुकारे वितरित केले जायचे. कालांतराने शासनाने या दूध संकलनात अनेक धोरणात्मक बदल केले. निकषही लावले. यामुळे फॅट सिस्टीममध्ये न बसणारे दूक संकलन करून नेल्यानंतर जिल्हा दूध संघ गावातील संस्थांना परत करीत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. परिणामी, हळूहळू शेतकऱ्यांनी या सहकारी संस्थांना दूध देणे बंद केले व खासगी दूध खरेदीदारांचा शिरकाव या व्यवसायात झाला. नागपूरसारख्या ठिकाणाहून अनेक दूध खरेदीदार जिल्ह्यातील गावांतून दूध संकलन करून नेऊ लागले. त्याचे चुकारे वेळेतच उपलब्ध करून दिले जात. यामुळे दूध उत्पादक खासगी खरेदीदारांकडे वळल व सहकारी तत्वावरील या संस्था मोडित निघाल्या. आता साधारणत: ग्रामीण व शहरी भागात २४ ते ३० रुपये लीटरच्यावरच दूधाची खरेदी करण्यात येत आहे. गोरस भंडारसारखी सहकारी तत्वावर चालविली जाणारी संस्था या स्थितीतही मजबूतपणे टिकून आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला व दुधाला भाव दिल्यामुळे त्यांच्याकडे अजूनही गावा-गावांतून दूध येत आहे; पण वर्धा जिल्हा मुख्यालयात जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून दररोज शेकडो लीटर दूध आणून त्याची विक्री शहरात करणारे अनेक लोक आहेत. शासनाने दूधाचे दर वाढविल्यास या दूध विक्रेत्यांकडून ग्राहकांकडे विक्री होणाऱ्या दूधाची किंमतही वाढविली जाण्याची शक्यता आहे. गोरस भंडारच्या दुधाचेही दर वाढू शकतात, अशी शक्यता एका वितरकाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. सध्या गोरस भंडारचे दूध ४० रुपये लीटर दराने ग्राहकाला विकले जाते व उत्पादकाला ३५ रुपये दर दिला जातो. शासनाच्या दुधाचे दर वाढल्यास जिल्हा मुख्यालयात व तालुक्याच्या ठिकाणी खुल्या दुधाची विक्री करणारे दूध उत्पादक आपल्याही दुधाची किंमत वाढविण्याची शक्यता आहे. काही शेतकरी दूध थेट ग्राहकांना विकण्यासाठी आणतात. ते सुद्धा दर वाढवू शकतात. त्यामुळे दूध दरवाढीचा फटका थेट ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. तसेच दूधापासून तयार होणारे दही, ताक, लोणी, तूप आदी पदार्थांचेही दर वाढतील, अशी शक्यता आहे. शासनाच्या सध्याच्या २४ रुपये प्रती लीटर दरात ३ रुपयांची वाढ होऊन शासन २७ रुपये दराने दुधाची खरेदी करेल, असे सुत्रांचे म्हणणे आहे.
जिल्हा दूध उत्पादक संघ का निघाला मोडीत
१९८० च्या दशकात वर्धा जिल्हा दूध संघ वैभवशाली स्थितीत होता. तत्कालीन अध्यक्ष दिवंगत जगन्नाथ ढांगे यांच्या नेतृत्वात जिल्हा संघाची वाटचाल सुरू होती. अत्यंत कठोर प्रशासक असलेले ढांगे हे जातीने जिल्हा दूध संघाच्या कारभाराकडे लक्ष देत होते. जिल्ह्यातून जवळपास १०० हून अधिक सहकारी दूध संस्थांकडून हे दूध संकलित केले जात होते. शेतकऱ्यांना वेळेत चुकारे व दर्जेदार दूध खरेदीवर जिल्हा दूध संघाचा भर होता; पण कालांतराने दुधाच्या या पांढऱ्या व्यवसायात गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले. खरेदी केलेल्या दुधात वाहतुकीदरम्यान पाणी टाकण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या संकलन केंद्रावर दूध पोहोचेपर्यंत त्यातील फॅट कमी होण्याचाही प्रकार सुरू झाला. यामुळे अनेकवेळा सहकारी संस्थेचे दूध नाकारण्याची परिस्थिती निर्माण व्हायची व सहकार क्षेत्रात गावागावांत बदलत्या स्थितीमुळे चुकीचे पायंडे पडले. परिणामी, जिल्हा दूध संघ मोडीत निघाला. तो अजूनही सुस्थितीत आल्याचे म्हणता येणार नाही.
शेतकऱ्यांना भाववाढ मिळणार असेल तर ही बाब चांगलीच आहे. जिल्ह्यात मदर डेअरी व अन्य संस्था दूध संकलन करणार असल्या तरी याचा परिणाम दूध संघावर झालेला नाही. शेतकऱ्यांना नेमकी किती भाववाढ द्यावी याबाबत मार्गदर्शक सूचना आलेल्या नाही. तशा सूचना आल्यावर शेतकऱ्यांना सदर भाववाढ देण्यात येईल. साधारणत: ३ रुपयांपर्यंत प्रती लीटर भाववाढ होऊ शकते. सध्या २४ रुपये लीटर हा भाव दिला जात आहे. दहा ते बारा हजार लीटर दुधाचे दररोज संकलन जिल्हा दूध संघ करीत आहे.
- सुनील राऊत, अध्यक्ष, जिल्हा दूध संघ, वर्धा
गोरस भंडार सध्या शेतकऱ्यांकडून ३५ रुपये लीटर दराने दुधाची खरेदी करीत आहे. शासनाचा जिल्हा दूध संघ सध्या २४ रुपये दर देतो. आता तो वाढेल. गोरस भंडार ग्राहकाला ४० रुपये दराने दूध विकते. शासनाने दूध दरवाढीचा निर्णय घेतला असता तरी गोरस भंडारच्या दुधाची किंमती वाढवायची की नाही, याबाबत अंतिम निर्णय संचालक मंडळच घेऊ शकेल; पण दरवाढ केली असल्यामुळे दुधाचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- एम.एन. कडू, व्यवस्थापक, गोरस भंडार, वर्धा.