पावसाळ्याच्या तोंडावर शहर कचऱ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 05:00 AM2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:00:02+5:30
पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक्या फळ-भाजीपाल्यावर जनावरे उच्छाद घालत आहे. मात्र, नगरपालिकेकडून नियमित कचऱ्याची उचल होत असल्याचे दिसून येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळा तोंडावर असताना शहरातील विविध भाग आणि मार्गालगत अस्वच्छतेने कळस गाठला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव असतानाच साथीचे आजार बळावण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. याकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचा कानाडोळा आहे.
पावसाळ्याचे नियोजन म्हणून नगरपालिकेच्या वतीने विविध भागातील नाल्यांची स्वच्छता केली. मात्र, लहान नाल्यांची स्वच्छता आणि विविध भागात असलेले कचऱ्याचे ढीग उचलण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला असल्याचे चित्र आहे. शहरातील महादेवपुरा, इतवारा बाजार, केसरीमल कन्या शाळा परिसर, न्यू हायस्कूल परिसर, सुदामपुरी, गांधीनगर, गजानननगर, आर्वी नाका, हवालदारपुरा, मालगुजारीपुरा, गोंड प्लॉट, भामटीपुरा, कृष्णनगर, रामनगर, आदिवासी कॉलनी आदी ठिकाणी कित्येक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पडून आहेत. न्यू इंग्लिश हायस्कूल परिसरात पालिका संचालित लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेच्या भिंतीलगतच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
तसेच या मार्गावरील निरूपयोगी विहिरीला घाणीने विळखा घातलेला आहे. पावसामुळे हा कचरा कुजून प्रचंड दुगरंधी सुटलेली आहे. परिणामी, येथून नागरिकांना नाकावर रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. केसरीमल कन्या शाळा परिसरात भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला आणि फळे टाकली जात असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या सडक्या फळ-भाजीपाल्यावर जनावरे उच्छाद घालत आहे. मात्र, नगरपालिकेकडून नियमित कचऱ्याची उचल होत असल्याचे दिसून येत नाही. कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असतानाच कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित नगरसेवक, नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे. शहरातील विविध भागात नगरपालिकेने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
फळ-भाजी विक्रेत्यांचा बेशिस्तपणा
शहरातून जाणाऱ्या नागपूर मार्गालगत केसरीमल कन्या शाळेत अनेक भाजी-फळ विक्रेत्यांनी अस्थायी स्वरूपात रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत. हे व्यावसायिक दुकान बंद करतेवेळी सडकी भाजी आणि फळे केसरीमल कन्या शाळा परिसरात ठेवलेल्या कंटेनरमध्ये न टाकता रस्त्याच्या कडेला फेकतात. भाजी-फळविक्रेत्यांच्या या बेशिस्तपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. नगरपालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.