शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:40 PM2018-02-02T23:40:01+5:302018-02-02T23:41:33+5:30
गत काही दिवसांपासून शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरू आहे. संत कंवरराम भवन समोरील सिसमचे मोठे झाड तोडण्यात आले. याशिवाय शहरातील मोक्याच्या जागेवर असलेले वृक्ष तोडण्यात येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : गत काही दिवसांपासून शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरू आहे. संत कंवरराम भवन समोरील सिसमचे मोठे झाड तोडण्यात आले. याशिवाय शहरातील मोक्याच्या जागेवर असलेले वृक्ष तोडण्यात येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ही बाब पर्यावरणासाठी धोकादायक असल्याने या समस्येकडे पर्यावरण संवर्धन संस्थेने लक्ष वेधले आहे.
पर्यावरण संवर्धन संस्थेच्या चमूने याबाबत सविस्तर माहिती मिळवली असता सिसमचे झाड कंवरराम भवनचे मालकांनी तोडल्यासाठी सांगितल्याचे समजले. येथे पार्किंगची व्यवस्था करायची आहे म्हणून सदर झाड तोडल्याची माहिती मिळाली. तसेच या मार्गावर सिमेंटचे फ्लोअरींग सुरू आहे. त्यामुळे या रांगेत असलेलीआन्य ३-४ मोठी झाडही तोडण्याची शक्यता आहे. सेंट जॉन शाळेसमोरील मोठे कडूनिंबाचे झाड अज्ञाताने जाळल्याची माहिती उघड आली. पर्यावरण संवर्धन संस्थेच्या चमुने तातडीने अग्निशमन दलाला बोलावून आग आटोक्यात आणली. शहरात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. यासंबंधी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पोलिसांत तक्रार केली, परंतु यावर कारवाई झाली नाही. संबंधितांची चौकशी करुन कुठल्याच प्रकारचा दंड किंवा शिक्षा होताना दिसत नाही. नगर पालिका सरसकट झाड तोडण्याची परवानगी देत नाही असे असताना सदर वृक्षतोड होण्यामागे कुणाचा वरदहस्त आहे, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यावरण संवर्धन संस्थेने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
पर्यावरण संस्थेची पालिकेकडे तक्रार
यशवंत नगर येथे संत कवंरराम भवन जवळ अवैध वृक्षतोड प्रकरणी काही सामाजिक संघटनेच्या चमुने नगरसेवक मनीष देवढे यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणाची तक्रार स्थानिक नगर पालिकेकडे केली. परंतु, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. एकीकडे सबंध राज्यात वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रूपये निधी खर्च होत असताना दुसरीकडे क्षुल्लक कारणासाठी अवैध वृक्षतोड होत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून स्थानिक पालिका प्रशासनाने व सामाजिक वनिकरण विभागाने चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, ही अपेक्षा मनीष देवढे यांनी व्यक्त केली.
पर्यावरणाची हानी याप्रकारे सुरू राहिल्यास आणि त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही तर वृक्षकटआई चालुच राहिल. यामुळे शहर भकास व्हायला वेळ लागणार नाही अशी, भिती पर्यावरण संवर्धन संस्थेने व्यक्त केली आहे. याबाबत पालिका प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.