शहरातील बाजारपेठेत सॅनिटायझर, मास्कची भीषण टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 05:00 AM2020-03-15T05:00:00+5:302020-03-15T05:00:04+5:30
जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, या विषाणूजन्य आजाराचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. दिवसातून किमान तीन ते चारवेळा आणि शक्य होईल तेव्हा हात स्वच्छ धुण्यासोबतच स्वच्छता बाळगण्याच्या सूचना आहेत. घाबरू नका, पण काळजी अवश्य घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. पुणे आणि नागपूरमध्ये कोरोना विषाणूसंसंर्गित रुग्ण आढळून आले आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांकडून सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी केली जात आहे. मात्र, सद्यस्थितीत बाजारपेठेत एकाही औषधविक्रेत्याकडे सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध नसून प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, या विषाणूजन्य आजाराचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. दिवसातून किमान तीन ते चारवेळा आणि शक्य होईल तेव्हा हात स्वच्छ धुण्यासोबतच स्वच्छता बाळगण्याच्या सूचना आहेत. घाबरू नका, पण काळजी अवश्य घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी संपूर्ण जिल्ह्यात बुधवारपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. ज्यादा दराने मास्कची विक्री आणि औषधाची साठेबाजी करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे. भीतीपोटी अनेक नागरिकांनी सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी केली. अद्याप नागरिकांचा खरेदीकडे कल आहे. मात्र, शहरात मागील पंधरा दिवसापासून सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध नसल्याची माहिती एका ठोक औषधविक्रेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वर्ध्यात मुंबई, नवी दिल्ली आणि नागपूर येथून सॅनिटायझर आणि मास्कचा ठोक औषधविक्रेत्यांना पुरवठा होतो. या औषधविक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना या वस्तूंचा पुरवठा केला जातो. मात्र, चीनमधील वुहानमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणावर या वस्तूंची निर्यात झाल्याचे सांगण्यात येते. याचाच परिणाम आता कंपनीतच माल नसल्याने त्यांनी पुरवठा बंद केला आहे. टंचाई निर्माण झाल्याने आणि मागणी वाढल्याने राज्यातील अनेक बड्या शहरांमध्ये या वस्तूंचा काळाबाजारही फोफावला असल्याची वास्तविक स्थिती आहे. मुंबई येथे अन्न व औषध प्रशासनाने नुकत्याच घातलेल्या छाप्यात बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला.
केवळ २० तास करता येतो वापर
डिस्पोझेबल मास्कचा वापर केवळ साधारणत: २० तासांकरिता करता येतो. मात्र, अनेकांनी खरेदी केल्यानंतर सलग पाच ते सहा दिवस त्याचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. वास्तविक एक दिवसापेक्षा अधिक दिवस त्याचा वापर करू नये, असे तज्ज्ञ डॉक्टर औषधविक्रेत्यांचे म्हणणे आहे. वापरानंतर डिस्पोझेबल मास्कची जाळून व अन्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
बाजारपेठेत फॅन्सी मास्क दाखल
कोरोनाचा धसका घेतल्याने नागरिकांची पावले मास्क खरेदीकडे वळू लागली आहेत. मात्र, शहरातील बाजारपेठेत औषधविक्रेत्यांकडे मास्क उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक कापड दुकानात आणि हातगाड्यांवर सहज उपलब्ध होत असलेल्या जाळीदार कापडाचे मास्क खरेदी करीत आहेत. वातावरण लक्षात घेता काही व्यावसायिक संधीचे सोने करीत असल्याचे चित्र आहे.
असे आहेत मास्कचे प्रकार
मास्कमध्ये टू लेअर, थ्री लेअर, एन-९५ आणि डिस्पोझेबल याशिवाय अन्य प्रकार होतात. वर्गीकरणानुसार मास्कचे दर आहेत. यापूर्वी पाच रुपयांना मिळणाºया डिस्पोझेबल मास्कसह इतर मास्कला मोठी मागणी वाढली. मात्र, कंपन्यांकडून ठोक विक्रेत्यांना पुरवठाच बंद झाल्याने औषधविक्रेत्यांकडे कुठल्याच प्रकारचे मास्क उपलब्ध नाहीत.