रोहित्रांजवळ राबविणार स्वच्छता मोहीम
By admin | Published: April 17, 2017 12:49 AM2017-04-17T00:49:48+5:302017-04-17T00:49:48+5:30
वीज वितरण रोहित्रांजवळ कचरा टाकला जातो. परिणामी, वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
महावितरणच्या मुख्य अभियंत्यांचे निर्देश
वर्धा : वीज वितरण रोहित्रांजवळ कचरा टाकला जातो. परिणामी, वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. हा कचरा काही अज्ञात जाळत असल्याने रोहीत्र व वीज तारांना नुकसान होते. कचऱ्यावर पक्षी येऊन ते तारांवर बसल्याने अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे रोहित्राजवळ स्वच्छता मोहीम राबविण्याच्या मुख्य अभियंत्यांच्या सूचनांवरून २० एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
नागपूर परिमंडळात सर्वत्र ही मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याच्या सूचनाही मुख्य अभियंत्यांनी दिल्या आहेत. यासाठी परिमंडळातील प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी उपविभागीय अभियंत्यांशी चर्चा करून कार्यक्रमाची आखणी करावयाची आहे. यासाठी ज्या-ज्या वितरण रोहित्राजवळ कचरा टाकण्यात येतो, ती नेमकी जागा हेरून तेथे ही मोहीम राबवायची आहे. सोबतच या मोहिमेत परिमंडळ, मंडळ, विभाग, उपविभाग आणि शाखा कार्यालयातील प्रत्येक अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने पुढाकार घेऊन त्याचा अहवाल व छायाचित्रे परिमंडळ कार्यालयाला गुरुवारी सायंकाळपर्यंत पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)