स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा
By admin | Published: January 1, 2017 02:04 AM2017-01-01T02:04:56+5:302017-01-01T02:04:56+5:30
महाविद्यालयीन युवकांना पाणी पुरवठा व स्वच्छता विषयाकडे आकर्षित करून स्वच्छता अभियानात त्याचा सक्रीय सहभाग
विद्यार्थ्यांना संधी : स्वच्छ भारत मिशनचा उपक्रम
वर्धा : महाविद्यालयीन युवकांना पाणी पुरवठा व स्वच्छता विषयाकडे आकर्षित करून स्वच्छता अभियानात त्याचा सक्रीय सहभाग घेण्यासाठी राज्यात दरवर्षी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून स्वच्छ भारत मिशन जि.प. अंतर्गत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय स्पर्धेतून जिल्हा स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड होईल. यात वक्तृत्व शैलीचे उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या स्पर्धकांची निवड राज्य स्पर्धेसाठी होणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पाणी पुरवठा, पाणी गुणवत्ता व स्वच्छता या बाबीची जागृती करणे तसेच पाणी व स्वच्छतेबाबत प्रत्येक महा.तून संदेश वाहक अभ्यासू वक्ते तयार करून जागृती करणे, हे स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांना स्वच्छतेचा प्रसार, प्रचार करण्यासाठी उद्युक्त केले जाते. उत्कृष्ट वक्तृत्व शैलीने विषयाची बहारदार मांडणी करणाऱ्या विजेत्या स्पर्धकाला पुरस्कार दिले जातात. तालुकास्तर विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार ठेवण्यात आले आहे. दोन्ही गटातून प्रथम व द्वितीय विजेते जिल्हास्तरीय स्पर्धेस पात्र ठरतील.
ही स्पर्धा ३ जानेवारीपूर्वी आठही तालुक्यात आयोजित केली जात आहे. सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)