‘आलेखन’ स्पर्धेतून स्वच्छतेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:38 PM2018-01-08T23:38:16+5:302018-01-08T23:39:47+5:30

शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा सध्या वर्धा नगर परिषदेने उचलला आहे.

Cleanliness lessons from 'Drafting' competition | ‘आलेखन’ स्पर्धेतून स्वच्छतेचे धडे

‘आलेखन’ स्पर्धेतून स्वच्छतेचे धडे

googlenewsNext
ठळक मुद्देवर्धा नगरपरिषदेचा उपक्रम : जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचे घेणार सहकार्य

आॅनलाईन लोकमत
वर्धा : शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा सध्या वर्धा नगर परिषदेने उचलला आहे. त्या दिशेने सध्या प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मोहिमेसाठी प्रभावी जनजागृती करता यावी म्हणून नगर परिषद व सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १० जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘आलेखन’ या भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून शहरवासियांना स्वच्छतेचे धडे देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या प्रचार-प्रसाराचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. स्पर्धेच्या प्रचार-प्रसार मोहिमेदरम्यान स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले जात आहे. इतकेच नव्हे तर अस्वच्छता करणाºयांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान शहरातील दोन व्यावसायिकांना कचरा जाळल्याचे कारण देत १० हजारांचा दंड आकारण्यात आला असून त्याची वसुलीही करण्यात आली आहे.
‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ या विषयावर आधारित ‘आलेखन’ या खुल्या भिंती चित्र स्पर्धेत चार-चार विद्यार्थ्यांची एक चमू, असे सुमारे १०० गट सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत ५५ गटांची नोंदणी झाली आहे. इतकेच नव्हे तर स्पर्धेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी काही कर्मचाºयांची नगर परिषद कार्यालयातील स्वच्छता विभागात नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना रोख पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
स्वच्छ व सुंदर वर्धेकरिता आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले. यातून काही काळ शहर स्वच्छही झाले; पण यातील सातत्य कायम न राहिल्याने सध्या शहरात कचºयाचे साम्राज्य दिसतेच. यावर उपाय आता आखण्यात आले आहेत.
अस्वच्छता करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई
नागरिकांकडून ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी त्यांना दोन वेगवेगळ्या रंगांच्या छोट्या कचरा पेट्या नगर पालिकेच्यावतीने देण्यात येत आहेत. अवघ्या आठ दिवसांमध्ये १२६ कुटुंबीयांना सदर कचरा पेट्या देण्यात आल्या आहेत. घरातील कचरा रस्त्यावर टाकणाºयांवर व परिसरात अस्वच्छता करणाऱ्यांवर २०० ते १००० रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
कचरा जाळणे भोवले
नेहमी कचरा जाळणाऱ्या शहरातील दोन व्यावसायिकांवर न.प. स्वच्छता विभागातील कर्मचाºयांनी थेट दंडात्मक कारवाई केली. त्या दोन्ही व्यावसायिकांकडून न.प. प्रशासनाने १० हजारांचा दंड वसूल केला आहे.
घंटा गाडीद्वारे गोळा होतो कचरा
स्वच्छ वॉर्ड स्पर्धेच्या उद्देशाने सध्या वर्धा नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातून दहा मालवाहू घंटा गाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा गोळा केला जात आहे. नागरिकांना घरातील ओला व सुका कचरा घरातच वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करण्यासाठी छोट्या कचरापेट्या न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या नेतृत्त्वात देण्यात येत आहेत. आतापर्यंत १२६ कुटुंबीयांना सदर कचरा पेट्या वितरित करण्यात आल्या असून पाच टप्प्यात २६ हजार कुटुंबांना कचरा पेट्या देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सहा हजार कुटुंबाला कचरा पेटी देण्याचे निश्चित करण्यात आले असून त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

स्वच्छ वर्धेच्या स्वप्नपूर्तीसाठी आलेखन या खुल्या भिंती चित्र स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. नागरिकांनी घरातील कचरा रस्त्यावर न टाकता तो घरातच न.प. द्वारे दिल्या जाणाºया दोन वेगवेगळ्या कचरा पेटीत गोळा करावा. तो न.प.च्या घंटागाडी धारकांना द्यावा. घंटागाडी आपल्या भागात येत नसल्यास त्याबाबतची तक्रार नागरिकांनी पालिकेकडे करावी.
- प्रवीण बोरकर, आरोग्य विभाग प्रमुख, न.प. वर्धा.

Web Title: Cleanliness lessons from 'Drafting' competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.