स्वच्छ अभियानाची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:33 PM2018-09-12T22:33:52+5:302018-09-12T22:34:29+5:30
स्वच्छ भारत अभियान योजनेच्या प्रचार व प्रसाराकरीता नगर परिषदेला प्राप्त झालेल्या निधीची खोटी बिले काढून केलेल्या भ्रष्टाचाराची प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळ जगताप यांनी नागरिकांना प्रत्यक्ष ठिकाणावर नेऊन पोलखोल केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : स्वच्छ भारत अभियान योजनेच्या प्रचार व प्रसाराकरीता नगर परिषदेला प्राप्त झालेल्या निधीची खोटी बिले काढून केलेल्या भ्रष्टाचाराची प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळ जगताप यांनी नागरिकांना प्रत्यक्ष ठिकाणावर नेऊन पोलखोल केली. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेला भाजप पदाधिकाऱ्यांनीच उधळी लावल्यामुळे संताप व्यक्त केल्या जात आहे. यात सहभागी असलेल्या सर्वांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या शत प्रतिशत ताब्यात असलेल्या येथील नगर परिषदेला स्वच्छ भारत योजनेअंतर्गत लाखो रूपये प्राप्त झाले. या योजनेच्या प्रचाराकरिता नगर परिषदेने शहरातील महत्वाच्या ठिकाणावरील भिंतीवर रंगरंगोटी करून लिहिण्याचा कंत्राट नगर परिषदेमध्ये सतत वावरत असलेल्या अतुल तंबाखे यांना दिले.
शहरातील टाऊन हॉलच्या भिंतीवर ७ शब्द लिहायचे ७ हजार रूपये, गांधी विद्यालयाच्या भिंतीवर ६ शब्द लिहायच ३ हजार रूपये, वन विभागाच्या भिंतीवर ६ शब्द लिहायचे ६ हजार ६५० रूपये, तहसील निवास स्थानाच्या भिंतीवर ६ शब्द लिहायचे ५ हजार २५० रूपये, उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षा भिंतीवर ६ शब्द लिहायचे ३ हजार ४०० रूपये, कदम पेट्रोल पंपच्या भिंतीवर ६ शब्द लिहायचे ५ हजार २०० रूपये, बस आगाराच्या सुरक्षा भिंतीवर १२ शब्द लिहायचे ८ हजार ८०० रूपये, नवीन मटन मार्केटच्या सुरक्षा भिंतीवर ६ शब्द लिहायचे ८ हजार ७५० रूपये, तलाव रोड बर्फ कारखाण्यावर ६ शब्द लिहायचे ४ हजार २०० रूपये, आयटीआय कॉलेजच्या भिंतीवर ८ शब्द लिहायचे ६ हजार ८०० रूपये, ग्रामीण रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीवर ६ शब्द लिहायचे ३ हजार ७५० रूपयाचे, बसस्थानकाच्या स्वच्छता गृहाची रंगरंगोटी व १२ शब्द लिहायचे ४७ हजार ७०० रूपये, शिवाजी चौकातील पुतळ्या खाली रंगरंगोटी व शब्द लिहायचे ३३ हजार ७५० रूपये, अटल बिहारी उधानातील दर्शनीय भिंतीवर रंगरंगोटी करून ८ शब्द लिहायचे ३५ हजार १०० रूपये, स्वामी समर्थ उधानाच्या भिंतीवर एकही शब्द लिहिला नाही खर्च २ हजार रूपये, हमाल पुºयातील शासकीय गोदामावर एकही शब्द लिहीला नाही ३ हजार ५०० रूपये, शिवाजी शाळेच्या भिंतीवर एकही शब्द लिहला नाही बील २ हजार रूपयाचे तर काढलेच याशिवाय कहर म्हणजे आर्वी शहरात अस्तीत्वातच नसलेल्या राधा स्वामी उधानाच्या नावाने ५१ हजार १२० रूपयाचे बील काढण्यात आले आहे.
२ लक्ष ४९ हजार २८० रूपयाचे हे बील काढताना कामाचे मोजमाप रजिस्टर लिहिल्या गेले नाही. मोजमाप करून अहवाल सुध्दा सादर केल्या गेला नाही. अंतर्गत लेखापरिक्षण झाले नाही. फक्त लेखाप्रमुखाने पडताळणी केली आणि मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी बील मंजूर केल्याची माहिती बाळ जगताप यांनी शहरातील नागरिकांना प्रत्यक्ष मजकूर लिहिलेल्या ठिकाणावर नेवून दिली. यात तत्थ आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी सुधीर जाचक, अरसलान खान, सैय्यद जुनेद, विक्रम भगत, संजय कुरील, धीरज गिरडे, संतोष, गौरकार, मुकेश मस्के, मुन्ना दमाये, मनोहर उईके, संदीप राठोड, जुम्मा शाहा, बाल्या राऊत आदी हजर होते.
अडचणीत वाढ
युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने विधानसभा क्षेत्र प्रमुख दिलीप पोटफोडे यांनी मंगळवारी पालिकेच्या घरकुल यादीत नगरसेवकांच्या नातलगांचा समावेश असल्याचा आरोप केला. व यादीच त्यांनी सादर केली. पालिकेत पुंगी पेटारा गुंडाळो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.