सीमेवरील बीअर बार बंदने मद्यपींच्या खिशाला चटका
By admin | Published: April 10, 2017 01:29 AM2017-04-10T01:29:22+5:302017-04-10T01:29:22+5:30
राज्य मार्गावरील ५०० मिटर अंतरातील दारूची दुकाने, बिअर बार बंद करण्यात आल्यानंतर दारूबंदी असलेल्या वर्धा
छुपी विक्री करणाऱ्यांकडून दारूच्या किमतीत घसघशीत वाढ : ५० रुपयांची देशी दारू झाली शंभर रुपयांची
वर्धा : राज्य मार्गावरील ५०० मिटर अंतरातील दारूची दुकाने, बिअर बार बंद करण्यात आल्यानंतर दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील मद्यपींची चांगलीच पंचाईत झाली आहे. जिल्ह्यालगत अमरावती, नागपूर, यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरील दारूची सर्वच दुकाने बंद झाल्याने येथील मद्यपींची घशाची कोरड भागविण्याकरिता भटकंती होताना दिसते. वर्धेतील मद्यपींना अवैधरित्या दारू पुरवठा करणारे विके्रतेही या संधीचे सोने करण्याच्या प्रयत्नात आहेत. पहिलेच चढ्या दराने दारू विकणाऱ्या या विक्रेत्यांकडून दारूच्या किमतीत घसघशीत वाढ केल्याची चर्चा असून मद्यपींच्या खिशालाही झळ बसू लागली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने १ एप्रिलपासून राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील सर्व बिअर बार तसेच वाइन शॉप बंद झालेत. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्याने या निर्णयाचा फारसा फरक पडला नसेल, असे सर्वांनाच वाटले असावे; पण राज्य मार्गावरील ५०० मीटर अंतरातील बिअर बार, वाइन शॉप बंद झाल्याने वर्धेतील मद्यपींचीही अडचण झाली आहे. जिल्ह्याची सिमा पार केल्यानंतर अमरावती, नागपूर, यतवमाळ जिल्ह्यातील बिअर बार, वाईन शॉपमध्ये जावून अनेक मद्यपी तृष्णा भागवायचे. नियमीत पिणाऱ्यांसोबतच प्रसंग साजरे करताना पिणारे अशा बिअर बार, वाइन शॉपचा आधार घ्यायचे. पण, आता हे बिअर बार, वाइन शॉप बंद झाल्याने मद्यपींची पंचाईत झाली आहे. त्यांना दारू मिळविण्याकरिता पराकाष्ठा करावी लागत असल्याचे चर्चित आहे.
जिल्ह्यात छुप्या, अवैध मागार्ने होणारी दारू विक्री सर्वांनाच परिचित आहे. पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच अनेक ठिकाणी खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचे शहरासह जिल्ह्यात दिसून आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
अवैध मागार्ने मिळणारी दारू मूळ किमतीच्या दुप्पट
जिल्ह्यातील विविध शहरांसोबतच ग्रामीण भागातील वेगवेगळ्या गावांमध्येही दारू विक्री होते. मध्यंतरीच्या काळात दारूच्या शिशिच्या मूळ किमतीवर ५० ते ६० रुपयांपर्यंत वरकमाई करणाऱ्यांनी आता दुप्पटच भाव केल्याचे बोलले जाते. राज्य मार्गालगतचे बिअर बार, वाइन शॉप बंद होताच १०० रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आल्याचे सांगितले जाते.
देशी दारूच्या शिशीची मूळ किमत ४६ रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. पूर्वी ही शिशी ५० आणि आता १२० ते १६० रुपयांपर्यंत मिळत असल्याचे बोलले जाते. विदेशी पूर्वी दीडशे रुपयांपर्यत आता १८० ते २०० रुपये, तर नामांकीत ब्रॅण्डची पूर्वी २०० मिळणार आता २३० ते २६० रुपये, २८० रुपयात मिळणारी आता ३२० रुपयांपर्यंत तर थंडी बिअर २०० ते २५० रुपयांपर्यंत मिळत असल्याचे सांगितले जाते.