धाडी गावात अस्वच्छतेचा कळस; आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:50 AM2017-07-24T00:50:56+5:302017-07-24T00:50:56+5:30
धाडी ग्रामपंचायत अंतर्गत एक वर्षापासून गावातील नाल्या साफ केल्या नाही.
नाल्या तुंबल्याने साचली गटारगंगा : ग्रामपंचायत विकास कामे सोडून राजकारणात दंग
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : धाडी ग्रामपंचायत अंतर्गत एक वर्षापासून गावातील नाल्या साफ केल्या नाही. यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते. पाणी वाहून जाण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने गटारगंगा साचली आहे. ग्रामसेवक सुटीवर असून सरपंच विकास सोडून राजकाणात दंग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
नाल्या तुंबल्यामुळे अळ्या तयार झाल्या आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे आजार तोंड वर काढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी उकिरडे साचले आहे. त्याखाली पाणी साचल्याने अळ्यांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक विहिरीत ब्लीचिंग पावडर टाकले नाही. यामुळे गावातील नागरिकांना दूषित व गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामस्थांनाही त्याच पाण्याची सवय करून घ्यावी लागत आहे. शौचालय बांधकाम अपूर्ण असल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गावातील पथदिवे कित्येक वर्षांपासून पडलेले आहेत.
गावातील नागरिक कराचा भरणा करीत असले तरी ग्रा.पं. च्या दुर्लक्षामुळे त्यांना प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. आष्टी-साहूर मार्गावर धाडी गाव असल्याने येथे अधिकारी वारंवार भेटी देतात. असे असले तरी ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छता करीत नाही. पाटील यांच्या घरासमोर मोठे डबके साचले आहे. वॉर्ड क्र. २ मध्ये घाण साचली आहे. वॉर्डातील नागरिक ओरडून थकले; पण कारवाई झाली नाही. मोठी ग्रामपंचायत असताना विकास कामांत माघारल्याचे दिसून येत आहे. गावातील सूमार दर्जाची कामे केविलवाणी अवस्था दर्शविणारी आहे. रस्त्यावरील उकिरडे साफ करून दुर्गंधी दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी धाडी गावाला एकदा भेट द्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.