मंदिरावर झेंडा बदलविण्याकरिता चढले अन् अघटित घडले.. तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा

By आनंद इंगोले | Published: August 30, 2023 05:32 PM2023-08-30T17:32:55+5:302023-08-30T17:35:17+5:30

रक्षाबंधनाच्या दिवशी घडला अनर्थ : पिपरी (मेघे) गावातील घटना

Climbed the temple to change the flag and lost his life due to electric shock! | मंदिरावर झेंडा बदलविण्याकरिता चढले अन् अघटित घडले.. तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा

मंदिरावर झेंडा बदलविण्याकरिता चढले अन् अघटित घडले.. तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा

googlenewsNext

वर्धा : देवीच्या मंदिरावरील झेंडा बदलविण्याकरिता तिघे मंदिरावर चढले. लोखंडी पाईपमध्ये असलेल्या या झेड्याचे संतुलन जावून तो झेंडा लगतच्या विद्युत वाहिन्यांवर पडल्याने तिघेही खाली फेकल्या गेले. यात एकाचा जागीच तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शहरालगतच्या पिपरी (मेघे) येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली.

अशोक विठोबा सावरकर (५६), सुरेश भाष्कर झिले (३५) व अशोक उर्फ बाळू नारायणसिंग शेर (६०) सर्व राहणार पिपरी (मेघे) असे मृतांची नावे आहे. वर्धा ते आर्वी मार्गावर पिपरी (मेघे) येथे नव्यानेच देवीच्या मंदिराची उभारणी करण्यात आली असून या मंदिरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. आज रक्षाबंधनानिमित्त या मंदिरावर लोखंडी पाईपमध्ये असलेला झेंडा बदलविण्याकरिता हे तिघेही मंदिरावर चढले होते.

मंदिरावरील झेंडा बदलविताना लोखंडी पाईप असंतुलीत होऊन मंदिरालगत गेलेल्या ३३ केव्हीच्या विद्युत वाहिन्यावर पडला. त्यामुळे पाईपमध्ये विद्युत प्रवाह संचारल्याने तिघांना जबर झकटा बसून तिघेही मंदिराच्या शेडवर फेकल्या गेले. यात तिघांना गंभीर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळीच घडलेल्या या घटनेमुळे गाव शोकसागरात बुडाले.  घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार महेश चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाºयांनी भेट देत चौकशी केली. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली.

दोघांवर एकावेळी झाले अंत्यसंस्कार

मृत अशोक विठोबा सावरकर हे ग्रामपंचायत कर्मचारी तर सुरेश भाष्कर झिले हे शिक्षा मंडळचे कर्मचारी असून ते त्यांच्या शेतीची जबाबदारी सांभाळायचे तर अशोक उर्फ बाळू शेर हे शेतकरी होते, अशी माहिती गावकºयांनी दिली. झिले यांचे मुळ गाव नागपूर जिल्ह्यातील बेला असल्याने त्यांचा मृतदेह बेला येथे पाठविण्यात आला. तर अशोक सावरकर आणि बाळू शेर या दोघांवर एकाचवेळी पिपरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

सणाच्या दिवशी गावात भयान शांतता

आज रक्षाबंधन असल्याने कालपासूनच या सणाची गावामध्ये लगबग सुरु होती. शाळांना सुटी असल्याने गावामध्ये या सणानिमित्त मोठा उत्साह असून प्रत्येक घरांमध्ये जोरदार तयारी सुरु होती. परंतु सकाळी साडेआठ वाजता या दुदैवी घटनेत तिघांचा जीव गेल्याने सर्वांनाच धक्का बसला. गावातील नागरिकांनी हातचे काम सोडून मंदिराकडे धाव घेतली. त्यानंतर गावामध्ये दिवसभर भयान शांतता होती. अनेक घरातील चुलीही पेटल्या नसून सर्वांनीही हळहळ व्यक्त केली. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह मिळाल्यावर दोघांवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Climbed the temple to change the flag and lost his life due to electric shock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.