तालुका कृषी विभागाची ‘घडी’ विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 05:00 AM2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:32+5:30

रोगाच्या या प्रादुर्भावातून सावरण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्याची गरज असताना कृषी विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कामकाजाची पद्धत जाणून घेण्याकरिता ‘लोकमत’च्या चमूने देवळी, सेलू, आर्वी, आष्टी व समुद्रपूर या पाच तालुक्यामध्ये ‘स्टिंग ऑपरेशन’ केले.

The ‘clock’ of the taluka agriculture department was shaken | तालुका कृषी विभागाची ‘घडी’ विस्कटली

तालुका कृषी विभागाची ‘घडी’ विस्कटली

Next
ठळक मुद्देदहा वाजताही तालुका कृषी कार्यालय कुलूपबंद : शेतकरी त्रस्त, कृषी विभाग निद्रिस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वरुणराजा मेहेरबान झाला आणि शेतशिवारात हिरवळ दाटली. पिकेही डोलायला लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. याच दरम्यान चकरी भुंगा, खोडमाशी, शंखीय गोगलगाय, गुलाबी बोंडअळी आदी कीटकजन्य रोगाने आक्रमण केले. रोगाच्या या प्रादुर्भावातून सावरण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्याची गरज असताना कृषी विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कामकाजाची पद्धत जाणून घेण्याकरिता ‘लोकमत’च्या चमूने देवळी, सेलू, आर्वी, आष्टी व समुद्रपूर या पाच तालुक्यामध्ये ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. सकाळी साडेनऊ वाजतापासून साडेदहा वाजतापर्यंत प्रतिनिधींनी कार्यालयाजवळ उपस्थित राहून पाहणी केली असता दहा वाजले तरीही काही कार्यालये कुलूपबंद होती तर काही कार्यालयामध्ये कर्मचारीच उपस्थित झाले नसल्याचे निदर्शनास आले. यावरून या खरीप हंगामाच्या काळातही तालुका कृषी विभाग किती सजग आणि कर्तव्यदक्ष आहे, हे दिसून आले आहे.

कार्यालय १०.१० वाजतापर्यंत बंद
स्थानिक तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेले तालुका कृषी अधिकारी कार्यालय सकाळी १० वाजून १० मिनिटापर्यंत कुलूपबंद होते. कृषी अधिकाऱ्यांनी या कार्यालयाचे दार उघडले. गेल्या काही महिन्यांपासून या कार्यालयात शिपायी नसल्याचे सांगण्यात आले. या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांची १७ पदे असून यातील १० पदे रिक्त आहेत. केवळ सात कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर तालुक्याच्या कृषी विभागाचा डोलारा आहेत. त्यातील दोन महिला कर्मचारी प्रसुती रजेवर तर काही इतर कारणाने रजेवर असल्यामुळे कार्यालयात नाममात्रच कर्मचारी कार्यरत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन व रोग नियंत्रणाची माहिती देण्यासोबतच शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी या कार्यालयाने पुढाकार घेण्याची गरज आहे. पण, येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनास्था ही समजण्यापलीकडे आहे. सकाळी साडेदहा वाजतापर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित झाले नसल्याने त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी व्यस्त दाखवित होता.

अधिकाऱ्यांची मुख्यालयाला दांडी
येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सकाळी दहा वाजता भेट दिली असता या कार्यालयामध्ये शिपायी व अधिक्षक असे दोनच कर्मचारी उपस्थित होते. या कार्यालयामध्ये ११ कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी चारच कर्मचारी वेळेत उपस्थित झाले होते. तालुका कृषी अधिकारीच सकाळी १०.१० वाजता कार्यालयात हजर झाले. कार्यालयातील मुख्य अधिकारीच वेळेचे बंधन पाळत नसेल तर इतर कर्मचारी कसे पाळणार? विशेष म्हणजे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक व कारकून आदी कर्मचारी हिंगणघाट, वर्धा येथून ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांच्या या मनमर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या समस्या बोकाळल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील या बिनधास्तपणाला आवर घालण्याची गरज आहे.

वेळेत कार्यालयीन कामकाज सुरु
येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सकाळी ९.३० वाजता भेट दिली असता शिपायाने कार्यालयाची स्वच्छता करुन अधिकाऱ्यांची आसन व्यवस्था नीटनेटकी केली. तसेच कार्यालयामध्ये येणाऱ्यांसाठी कार्यालयाच्या दर्शनी भागावर सॅनिटायझरची व्यवस्थाही केली. दहा वाजतापूर्वीच तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक तांत्रिक हे कार्यालयात पोहोचले. या कार्यालयामध्ये ११ कर्मचारी कार्यरत असून कृषी अधिकारी कोल्हापूर येथे कार्यालयीन कामकाजाकरिता गेले आहे. तर उर्वरित दहा कर्मचाऱ्यांपैकी ७ कर्मचाऱ्यांनी १० वाजून ५ मिनिटापर्यंत कार्यालयात उपस्थित होऊन कामकाजाला सुरुवात केली. उर्वरीत तीन कर्मचारी रजेवर असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यालयात १६ पदे मंजूर असून त्यापैकी ५ पदे रिक्त आहे.

पावणे दहापर्यंत निम्मेच कर्मचारी उपस्थित
येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय सकाळी ९.४० मिनिटांनी उघडण्यात आले. या कार्यालयामध्ये नियमित ९ आणि एक कंत्राटी असे दहा कर्मचारी कार्यरत आहे. सकाळी पावणे अकरा वाजतापर्यंत केवळ पाचच कर्मचारी कार्यालयामध्ये उपस्थित झाले होते. सहायक कृषी अधिकारी आज रजेवर असल्याचे तर कृषी अधिकारी सहा महिन्यांपासून प्रसुती रजेवर असल्याचे सांगण्यात आले. तालुका कृषी अधिकारी दौऱ्यावर गेल्याचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. एक कर्मचारी अकरा वाजतापर्यंत कार्यालयात आलेच नाही. कार्यालयात अशी अवस्था असल्यास कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या कशा सुटणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दौऱ्याच्या नावे कृषी सहाय्यक गायब
येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजता भेट देऊन पाहणी केली. तेव्हा अर्धेअधिक कर्मचारी सव्वा अकरा वाजतापर्यंतही कार्यालयात उपस्थित झाले नव्हते. कार्यालयातील महिला शिपाई गेल्या दोन महिन्यांपासून कोणताही अर्ज न देता रजेवर असल्याची माहिती पुढे आली. या कार्यालयात प्रभारी तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कनिष्ठ सहायक असे दहा कर्मचारी उपस्थित होते. तर ११ कृषी सहायक फिल्डवर गेल्याचे सांगण्यात आले. तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे त्यामुळे कृषी सहायक कुठल्या दौºयावर गेले, असा प्रश्न उपस्थित करताच अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. त्यामुळे अधिकारी दौऱ्याच्या नावावर गायब होत असून त्यांना कार्यालयातील वरिष्ठांकडून बळ मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Web Title: The ‘clock’ of the taluka agriculture department was shaken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.