जिल्ह्यातील २५० औषधी दुकाने बंद
By admin | Published: May 31, 2017 12:46 AM2017-05-31T00:46:37+5:302017-05-31T00:46:37+5:30
विविध मागण्या शासनदरबारी रेटण्यासाठी आॅल इंडिया आॅर्गनायजेशन आॅफ केमिस्टस्
बंदला संमिश्र प्रतिसाद : जिल्हा प्रशासनाला सादर केले मागण्यांचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विविध मागण्या शासनदरबारी रेटण्यासाठी आॅल इंडिया आॅर्गनायजेशन आॅफ केमिस्टस् अॅन्ड ड्रगिस्टस् व महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे एक दिवसीय देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. संघटनेच्या आवाहनाला जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मंगळवारी दिवसभर व्यावसायीक प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. जिल्ह्यातील जवळपास २५० औषधी विकेत्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेऊन या आंदोलनाला समर्थन दर्शविले.
आॅनलाईन फार्मसी, केंद्रीय ई-पोर्टलचा विचार केमिस्ट दुकानदारांना मान्य नाही. ई-पोर्टल नितीमुळे भारतातील औषधी विक्रेत्यांवर विपरीत परिणाम होणार असून औषधी मुल्य नियंत्रणामुळे औषधी विक्रेत्यांचे शोषण होणार असल्याचा आरोप करीत औषधी विकेत्यांच्याहिताचे निर्णय सरकारने घ्यावे आदी मागण्यांसाठी एक दिवसीय बंदचे आवाहन केले होते. जिल्ह्यातील जवळपास २५० औषधी विक्रेत्यांनी मंगळवारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सदर आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन औषधी विकेत्यांच्या संघटनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
याप्रसंगी नवल मानधनीया, आशीष मानधनीया, विशाल खोपडे, बी.एस. पंड्या यांच्यासह औषधी विक्रेता संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.