महापरीक्षा पोर्टल बंद; विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:31+5:30
शासनाने वादग्रस्त महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील भरती प्रक्रिया विभागस्तरावर घेतली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करताच तत्काळ महापरीक्षा पोर्टलला स्थगिती दिली होती. तसेच ते बंद करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू झाल्या होत्या. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रसिक खडसे यांनी तसे संकेत दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तत्कालीन शासनाने सुरू केलेले महापरीक्षा आॅनलाईन पोर्टल वादग्रस्त ठरले होते. परिणामी, विद्यमान शासनाने ही परीक्षा पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत करीत प्रतिक्रिया नोंदविल्या.
शासनाने वादग्रस्त महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील भरती प्रक्रिया विभागस्तरावर घेतली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करताच तत्काळ महापरीक्षा पोर्टलला स्थगिती दिली होती. तसेच ते बंद करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू झाल्या होत्या. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रसिक खडसे यांनी तसे संकेत दिले होते. विविध विभागातील रिक्त पदांच्या आरक्षण पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. ७२ हजार पदांची भरती पोर्टलमार्फत न घेता विभाग स्तरावर घेण्यात येणार आहेत. आता महाभरती पोर्टलद्वारे होणार नाही. याबाबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मते लोकमतने जाणून घेतली.
विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. भरती प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबवावी व लवकर भरती प्रक्रिया सुरू करावी, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीत महापरीक्षा पोर्टलचा मुद्दा तरुणाईने लावून धरला होता. सत्तेत आलो तर वादग्रस्त पोर्टल तत्काळ बंद करू, असे आश्वासन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दिले होते. मोठ्या राजकीय नाट्यमय घटनेनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. उद्धव ठाकरे यांनी सूत्रे सांभाळल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी लगेच महापरीक्षा पोर्टल बंद करण्याबाबत टिष्ट्वट केले होते.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पोर्टल बंद करण्याची मागणी केली होती. शासनाने सर्वप्रथम पोर्टलला स्थगिती दिली होती व विद्यार्थ्यांचे अभिप्राय मागविण्यात आले होते. महापरीक्षा पोर्टल बंद करावे, अशा प्रकारचे अभिप्राय बहुतांश विद्यार्थ्यांकडून शासनाला प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांकडून होणाºया प्रचंड विरोधानंतर महापरीक्षा पोर्टल अखेर बंद करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महापरीक्षा पोर्टलचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आॅनलाईन परीक्षा सुरू असताना येणारा विजेचा व्यत्यय, निकालांमध्ये अपारदर्शकता आदी बाबी समोर आल्या होत्या. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल कमालीची नाराजी दिसून आली होती. काँग्रेसचे विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी देखील आपल्या भाषणात हा मुद्दा लावून धरला होता.