‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ बंद
By admin | Published: March 10, 2017 12:51 AM2017-03-10T00:51:17+5:302017-03-10T00:51:17+5:30
येथील भाजपा कार्यकर्ता निखील कडू याला बुधवारी बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ
मूकमोर्चा काढून तहसीलदार व ठाणेदारांना मागणीचे निवेदन
आर्वी : येथील भाजपा कार्यकर्ता निखील कडू याला बुधवारी बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ आर्वी शहरात गुरुवारी सकाळी तीन तास व्यापारी प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवण्यात आली. तर भाजपाने आर्वीतील प्रमुख मार्गावरून माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्त्वात मुक मोर्चाचे आयोजन केले होते.
यावेळी तहसीलदार विजय पवार, ठाणेदार चव्हाण यांना निवेदन देत प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांनी आर्वी शहरात घातलेल्या हैदोसाबद्दल कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मारहाण करणाऱ्या विरूद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये कठोर कारवाईची करण्याची मागणी केली.
सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकुर लिहिल्याच्या कारणावरून बुधवारी दुपारी सर्कसपूरचे उपसरपंच व भाजपा कार्यकर्ता निखील कडू यांच्यावर प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने आज तब्बल तीन तास व्यापारी प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवण्यात आली. याच वेळी आर्वीतील शिवाजी चौक येथून दुपारी १२ वाजता माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने तहसीलदार व प्रभारी ठाणेदार चव्हाण यांना निवेदन दिले. या निवेदनात शहराची शांतता भंग करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याविरूद्ध व भाजपा कार्यकर्त्याला बेदम मारहाण करणाऱ्यावर भादंविच्या कलम ३०७ लावण्याची मागणी यावेळी भाजपा शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. माजी आमदार केचे यांनी या मारहाणीत आणखी सहभागी असणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी ठाणेदार चव्हाण यांच्याकडे केली. यावेळी आर्वी विधानसभा भाजपाचे प्रमुख विजय बाजपेयी, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद हिवाळे, शहराध्यक्ष विनय डोळे, न.प. सदस्य आर्वी तालुक्याचे भाजपाचे पदाधिकारी व सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.
या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी असलेले उपसरपंच निखील कडू यांच्यावर वर्धा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेतील मारहाण करणाऱ्या चार आरोपींना आर्वी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या या चार प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदारांनी दिली. त्यांना पोलीस कोठडी मिळाली अथवा जामीन याची माहिती पोलिसांकडून मिळाली नाही.(तालुका प्रतिनिधी)
भाजपा कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीची घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची व शहराची शांतता भंग करणारी आहे. या घटनेतील दोषी प्रहार संघटनेच्या हल्लेखोरावर कलम ३०७ नुसार कारवाई करावी, याबाबतची तक्रार वरिष्ठाकडे केली आहे.
- दादाराव केचे, माजी आमदार, आर्वी विधानसभाक्षेत्र