मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटत नाहीत, सुप्रिया सुळेंच्या फेसबुकवरुन 'तो' व्हिडिओ डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 01:33 PM2021-08-29T13:33:26+5:302021-08-29T15:03:43+5:30
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकालात होत नाही, तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होऊ नयेत. आपलं सरकार असतानाही वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त होऊ शकला नाही. जोपर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही, सध्या डेंग्यूनं थैमान घातलं आहे.
वर्धा - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे, तिन्ही पक्ष एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. मात्र, अनेकदा स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकमेकांचे पाय ओढावे लागतात. त्यातून, जुळवून घ्यावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धा येथील जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी थेट मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे शेतकऱ्याला भेटत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकालात होत नाही, तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होऊ नयेत. आपलं सरकार असतानाही वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त होऊ शकला नाही. जोपर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही, सध्या डेंग्यूनं थैमान घातलं आहे. त्यामुळे, सध्या कुठलाही राष्ट्रवादीचा कार्यक्रम वर्ध्यात घेऊ नका. शरद पवार यांनाही दिवाळीनंतरच इकडे पाठवा, असे वर्ध्यातील कार्यकारिणीच्या सभेत हिंगणाघाटचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी म्हटले. राजू तिमांडे यांनी उद्गविग्नपणे आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
सुप्रियाताई मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही औरंगाबादच्या सभेत म्हटला होतात. माझ्या बापाने रक्ताचं पाणी केलं म्हणून राष्ट्रवादी आज जिवंत आहे. हे जर खरं असेल तर राष्ट्रवादी कुठे चाललीय याचा विचार करायला हवा. केवळ शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्रात संघटन आहे. आज महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री मंत्रालयात बसतात. पण, मुख्यमंत्री बांधावरच्या शेतकऱ्यांना भेटू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांना भेटायचे, हा मुख्यमंत्री कुणाला भेटत नाही, असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंसमोरच मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत होते. मात्र, त्यावेळी व्हिडिओत तिमांडे यांचे भाषणही कैद झाले. मात्र, काही वेळातच हा व्हिडिओ सुप्रिया सुळेंच्या फेसबुक अकाऊंटवरुन डिलीट करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांवर स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने हल्लाबोल केल्यानेच हा व्हिडिओ हटविण्यात आला असल्याचे दिसून येते.