अचानक लागलेल्या आगीत साहित्याचा कोळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:53 PM2018-04-03T23:53:01+5:302018-04-03T23:53:01+5:30
एमआयडीसी भागातील प्लॉट क्र. ए-१३ येथील हुसेन अब्बास अली यांच्या मालकीच्या भंगार प्रोसेसिंग युनिटला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचालन आग लागली. क्षणार्धात आगीने परिसरातील साहित्य कवेत घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एमआयडीसी भागातील प्लॉट क्र. ए-१३ येथील हुसेन अब्बास अली यांच्या मालकीच्या भंगार प्रोसेसिंग युनिटला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचालन आग लागली. क्षणार्धात आगीने परिसरातील साहित्य कवेत घेतले. यात ट्रॅकसह विविध साहित्य जळून कोळसा झाल्याने हुसेन अब्बास अली यांचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉट सर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सोमवारी रात्रीच्या सुमारास भंगार प्रोसेसिंग युनिटमधून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना तथा अग्निशमन विभागालाही दिली. माहिती मिळताच वर्धा न.प.चा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. सुमारे ४ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीत भंगार प्रोसेसिंग युनिटमधील प्लास्टिकचे साहित्य, पेपरची रद्दी, भंगार म्हणून पडून असलेला एमएच २९ एम ८५२ क्रमांकाचा ट्रक व इतर साहित्य जळून खाक झाले. यात हुसेन अब्बास यांचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस ठाण्याचे दिलीप किटे व किरण आडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सेवाग्राम पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
धुऱ्याच्या आगीत गहू व शेती साहित्य भस्मसात
देवळी तालुक्यातील आंजी अंदोरी शिवारात आंजी येथील विनायक डडमल यांनी त्यांच्या शेतातील धुरा पेटविला. आगीने क्षणात शेजारच्या बाबाराव महादेव सलाम यांच्या मालकीच्या शेतातील गंजी करून ठेवलेल्या गहू व शेतीपयोगी साहित्याला आपल्या कवेत घेतले. या आगीत बाबाराव सलाम यांच्या मालकीचे गहू, कडबा व सिंचनासाठी वापरण्यात येणारे पाईप जळाल्याने सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. या प्र्रकरणी सलाम यांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी डडमल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.