धुऱ्यासोबत वृक्षांचाही कोळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:36 PM2018-04-05T22:36:05+5:302018-04-05T22:36:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीला प्रारंभ झाला आहे. यात शेतकरी शेतातील काडी कचरा, धुºयावरील गवत, झुपडे पेटवत आहे. हे करीत असताना शेतातील तथा रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या वृक्षांची काळजी घेतली जात नाही. परिणामी, अजस्त्र वृक्षही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. यात पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे.
पावसाळ्यापूर्वी शासनाकडून कोट्यवधी खर्च करून वृक्ष लावले जातात. यासाठी सर्व शासकीय विभाग तथा सामाजिक संस्था, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यासह स्थानिक स्वराज्य संस्थाना कामाला जुंपले जाते. जिल्ह्यात या माध्यमातून कोट्यवधी झाडे लावली जात आहे. काही प्रमाणात त्यांचे संगोपनही केले जाते; पण प्रत्येक उन्हाळ्यात हजारो झाडांचा बळी जातो. धुºयाला लावलेल्या आगीत मोठी झाडे भस्मसात होतात. हा प्रकार जिल्ह्यात प्रत्येक मार्गावर सर्रास दिसून येतो. कचरा पेटविण्याच्या नादात लाखमोलाची झाडे जळत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असून पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान होत आहे. वर्धा ते वायगाव, पुलगाव ते दहेगाव, वायगाव ते देवळी, आर्वी ते पुलगाव, वर्धा ते आर्वी यासह अन्य मार्गांवर शेकडो वृक्ष जळालेल्या अवस्थेत दिसून येतात. पुलगाव मार्गावर रेल्वे रूळाच्या दोन्ही बाजूंची झाडे जळालेल्या अवस्थेत दिसून येतात. देवळी तथा वर्धा तालुक्यातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतांत आगी लावण्याचे प्रकार केले जात आहेत. असाच प्रकार वायगाव आणि आर्वी मार्गावर वर्षभर पाहावयास मिळतो. हे प्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असून जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.
आगीच्याही अनेक घटना
शेतातील धुरे पेटविण्याच्या प्रकारातून अनेक गावांत आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यात गोठ्यातील साहित्याचा कोळसा झाला आहे. यातून वाद उद्भवून ते पोलिसांत पोहोचले आहेत. असे असताना जिल्ह्यात अद्यापही धुरे जाळण्याचे प्रकार सुरूच आहेत. या प्रकारातून शेजारी शेतकऱ्याची नुकसान भरपाई देण्याची वेळही शेतकऱ्यावर आली आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज
शेतकºयांकडून धुरे पेटविताना त्यांच्याकडून काटेरी झुडपे वा शेतात उगविलेली पिकांना त्रासदायक ठरणारी झुडपे जाळल्या जातात. ही झुडपे जाळताना शेतकरी आग लावून निघून जातात. यामुळे ही आग धुऱ्याने वाढत जाते. या प्रकारात मोठ मोठी झाडे आगीच्या विळख्यात येतात. यातून अनेक औषधीयुक्त झाले जाळल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे शेतीची कामे करताना धुरे जाळण्याच्या प्रकाराबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यामुळे कचरा जाळण्याच्या या प्रकारामुळे कोळसा होणारी मोठ मोठी झाडे वाचविणे शक्य होईल. याचा विचार जिल्हा प्रशासनाने करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यास धुऱ्यावर जळणारी ही मोठ मोठी झाडे वाचण्यास मदत होईल.
अनेक झाडांचा आतून कोळसा
धुऱ्याच्या आगीत होरपळलेली अनेक झाडे वरून ठीक दिसली तरी आतून जळत असतात. यामुळे अनेक झाडांचा कोळसा झालेला दिसतो.