कपाशीवर कोळशाचा हल्ला
By admin | Published: December 25, 2016 02:19 AM2016-12-25T02:19:29+5:302016-12-25T02:19:29+5:30
तालुक्यातील शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, नापिकी व आर्थिक कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहे.
आर्वीतील शेतकरी चिंतेत : अचानक वाढलेल्या थंडीचा परिणाम
आर्वी : तालुक्यातील शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, नापिकी व आर्थिक कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहे. असे असताना तालुक्यात अचानक वाढलेल्या थंडीने कपाशीवर कोळसा रोगाचे आक्रमण केले आहे. या रोगामुळे कपाशीचे झाड पूर्णत: काळे पडून वाकत असल्याचे चित्र तालुक्यातील शेत शिवारात आहे. कपाशी पिकावर आलेल्या या रोगाने शेतकरी धास्तावला असून यामुळे त्याच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
आर्वी तालुक्यात नगदी व एकरकमी पीक म्हणून कपाशीकडे पाहिले जाते. प्रारंभी तालुक्यात कपाशी पिकावर लाल्याचे आक्रमण झाले. त्यापूर्वी अतिवृष्टीच्या फटक्यामुळे पिकाच्या उत्पादनावर विपरित झाला. यामुळे कपाशी पिकावरील बोंडे खाली गळून पडली तर पिकाची वाढ खुंटली. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका होते न होते तोच कपाशीवर कोळसा रोगाने हल्ला चढविला आहे. या रोगामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीची झाडे पूर्णत: काळी पडली आहेत.
तालुक्यातील वागदा, वाठोडा, अहिरवाडा, देऊरवाडा, लाडेगाव, कर्माबाद, सर्कसपूर, राजापूर, नांदपूर, टाकरखेडा, एकलारा, जळगाव, वर्धमनेरी, वाढोणा, पिंपळखुटा, गुमगाव, रोहणा, नांदोरा, नेरी, खुबगाव, धनोडी, रसुलाबाद, दहेगाव, निंबोली (शेंडे) सह तालुक्यातील इतर गावांतील शेत शिवारात या रोगाचे चित्र आहे. या रोगामुळे पीक काळे पडल्याने शेतकऱ्यांनी शेताकडे जाणे टाळणे सुरू केल्याचे दिसून आले आहे.
यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न झाल्याने कपाशीवर शेतकऱ्यांची आशा होती. यातही या पिकावर कोळशासारख्या रोगाचे आक्रमण झाल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाने या रोगाबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन उपाययोजना सुचविण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
२३,६०० हेक्टरवरील पीक धोक्यात
तालुक्यातील बेनोडा येथील रामेश्वर जवंजाळ, नारायण भागवत, राजेंद्र चव्हाण, प्रज्वल गावंडे, रवींद्र वानखेडे, उमेश एकापूरे, पद्माकर गावंडे, सतीश भागवत, ओंकार गावंडे, दशरथ डेहनकर, जर्नादन मेश्राम यांच्यासह या परिसरात असलेल्या बेनोडा, मारोडा या दोन्ही गावातील ९० हेक्टर शेतपिकांच्या कपाशीवर या कोळसा रोगाचे आक्रमण झाले आहे. यात झाडाची पाने काळी पडून ती वाळू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यात आर्वी तालुक्यातील २३ हजार ६०० हेक्टरचे कपाशी पीक धोक्यात आले आहे.