मोसंबीच्या बगीच्यात बुलबुलने फुलविला संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:40 PM2018-08-26T22:40:40+5:302018-08-26T22:41:05+5:30
शहरातील सिमेंटची जंगलं आणि बदलेले राहणीमान यामुळे शहरातील पक्षांची किलबील काळाच्या आड जात आहे.पण, ग्रामीण भागातील शेतशिवार, बाग-बगीचे आणि गावातही पक्ष्यांचा अधिवास बऱ्यापैकी असल्याचे दिसून येत आहे.
अविनाश वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहणा (बोपापूर) : शहरातील सिमेंटची जंगलं आणि बदलेले राहणीमान यामुळे शहरातील पक्षांची किलबील काळाच्या आड जात आहे.पण, ग्रामीण भागातील शेतशिवार, बाग-बगीचे आणि गावातही पक्ष्यांचा अधिवास बऱ्यापैकी असल्याचे दिसून येत आहे. नुकताच एका मोसंबीच्या बगीच्यात लाल बुडाच्या बुलबुलने आपल्या तीन पिल्लांना जन्म देत आपल्या परिवारातील सदस्य संख्या वाढविली आहे.
पोहणा (बोपापूर) परिसरात लाल बुडाच्या बुलबुल पक्ष्यांचा आधिवास बºयापैकी आहे. नुकताच बोपापूर शिवारातील एका मोसंबी बागेत झाडाच्या पानाआड आपले छोटेसे घरटे विणून तीन पिल्लांना जन्म दिला आहे. विशेषत: या पक्षाच्या विणीचा काळ हा फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान असतो. परंतू बदलत्या ऋुतूचक्राचा परिणाम पक्ष्यांवरही झाला की काय? तर या बुलबुलने निसर्गनियम बाजुला सारत आॅगस्ट महिन्यात आपली अंडी उबविली. या पक्षाला पक्षीमित्र रेड व्हेन्टेड बुलबुल या इंग्रजी नावानेही ओळखतात. या पक्षांने पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्या पिल्लांचे संगोपनही काळजीपूर्वक करीत आहे.
असा असतो हा पक्षी
या पक्ष्याचा आकार साधारणात: चिमणीपेक्षा थोडा मोठा असून मुख्य रंग धुरकट तपकिरी तसेच डोक्याचा रंग काळा व त्यावर लहान शेंडी असते. त्याच्या पाठीवर आणि छातीवर तुरक रेषांसारख्या खुणा असतात तर पाठीचा मागील भाग पांढरा असतो. त्याची मुख्य ओळख म्हणजे याचा पार्श्वभाग लाल रंगाचा असतो. यावरूनच याला लाल बुडाचा बुलबुल या नावाने संबोधतात.
बुलबुलचा अधिवास
हा पक्षी उष्णकटिबंधीय वनात, झुडपी जंगलात, शेतात व बागेत जोडीने किंवा लहान थव्याने राहणारा पक्षी आहे. भारतासह बांग्लादेश, श्रीलंका व म्यानमार येथेही आढळतो.
नर व मादी दिसायला सारखेच असतात. या पक्ष्याचे घरटे जमिनीपासून १ ते १० मिटर उंचीपर्यंत झाडावर गवताचे खोलगट घरटे असते. मादी एकावेळी २ ते ३ फिकट गुलाबी रंगाची त्यावर तपकिरी अंडी देते. नर-मादी पिलांचे संगोपन करण्यापासून सर्व कामे मिळून करतात. या पक्ष्याचे किटक, फळे, दाणे व मध हे मुख्य खाद्य आहेत.