महिलेच्या पोटातून काढला दोन किलोचा गोळा
By admin | Published: March 10, 2017 01:00 AM2017-03-10T01:00:31+5:302017-03-10T01:00:31+5:30
स्थानिक राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे दुर्मिळ प्रकारात मोडणाऱ्या पोट विकाराबाबत नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया
आर्वी : स्थानिक राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे दुर्मिळ प्रकारात मोडणाऱ्या पोट विकाराबाबत नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. कालिंदी राणे व त्यांचे चमूने पार पाडली. ही शस्त्रक्रिया अत्यंत गरीब कुटुंबातील ३८ वर्षीय महिलेवर करण्यात आली. सदर महिलेच्या पोटातून दोन किलो वजनाचा गोळा काढण्यात आला.
सदर महिलेच्या पोटात अचानक तीव्र वेदना होऊ लागल्याने ती राणे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली. डॉ. कालिंदी यांना तिच्या पोटात गोळा असल्याची शंका आली. त्यांनी त्वरित सोनोग्राफी करण्याचा निर्णय घेतला. डॉ. बिजराज सींग (सोनोलॉजिस्ट) यांनी सोनोग्राफी केली असता तिच्या पोटातील गोळा आतल्या आत फिरल्याने त्याला आडी पडल्याचे निदान केले. महिलेला त्वरित शस्त्रक्रियेची गरज होती; पण तिची परिस्थती हलाखीची असल्याने शस्त्रक्रियेचा खर्च तिला परवडणारा नव्हता. असे असले तरी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याची बाब लक्षात घेत सामाजिक दायीत्वाच्या भावनेतून डॉ. कालिंदी व डॉ. रिपल राणे यांनी शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाची चिंता न करता किरकोळ खर्चात या महिलेवर शस्त्रक्रिया केली. तिच्या पोटातून दोन किलो वजनाचा गोळा काढून तिचे प्राण वाचविले.
या शस्त्रक्रियेसाठी डॉ. कालिंदी राणे यांना राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये कार्यरत संपूर्ण चमूने सहकार्य केले. यात डॉ. अमित मालपे, डॉ. प्रणित घोनमोडे (भूलतज्ञ), मदतनीस अजय निंबाळकर, आशिष अवचार व शस्त्रक्रिया विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या हॉस्पीटलमध्ये यापूर्वी आठ ते दहा वेळा अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवनदान देण्यात आल्याची माहिती संचालक डॉ. रिपल राणे यांनी दिली. गरीब रुग्णांना नेहमीच सेवा दिली जात असल्याने रुग्णांची सोय होते, अशा प्रतिक्रीया उमटत आहे.(शहर प्रतिनिधी)