सामूहिक प्रयत्नातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती शक्य
By admin | Published: May 20, 2017 02:13 AM2017-05-20T02:13:20+5:302017-05-20T02:13:20+5:30
शेतकऱ्यांनी सामूहिक व वैविध्यपूर्ण शेतमाल उत्पादन निर्मिती व प्रक्रिया केल्यास शेतमालाचे मूल्यवर्धन होईल.
शैलेश नवाल : शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : शेतकऱ्यांनी सामूहिक व वैविध्यपूर्ण शेतमाल उत्पादन निर्मिती व प्रक्रिया केल्यास शेतमालाचे मूल्यवर्धन होईल. उत्पादक गटांना आर्थिक उन्नती साध्य करता येईल. या उद्देशाने शेतमाल उत्पादक कंपन्यांनी कार्य उभारावे. यात शासनाकडून लागणारी आवश्यक मदत करण्यात येईल. व्यक्तिगत कार्याचा विस्तार आता उत्पादक गटात रुपांतरीत करून शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केले.
मगन संग्रहालय समिती येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यानंतर जिल्हाधिकारी नवाल यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी मोरे, गटविकास अधिकारी विजय लोंढे, नायब तहसीलदार सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी संजय हाडके, मंडळ कृषी अधिकारी धनविजय, विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादक कंपनीचे डॉ. एन. झेड. भिसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी नवाल म्हणाले, शेतकऱ्यांनी समूहाच्या माध्यमातून शेतीला लागणाऱ्या निविष्ठा, अवजारे यांची सामूहिकरित्या खरेदी आणि वापर करावा. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. शेतकऱ्यांनी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. शेतकऱ्यांची लुबाडणूक थांबविता येईल. यासाठी शेतकरी शेतमाल उत्पादक कंपन्यांची उभारणी महत्वाची आहे. शिवाय उत्पादित शेतमाल खरेदी विक्री करणे, प्रक्रिया करणे, बाजारपेठ मिळविल्यास हातभार लागेल. शेतकरी समूहाचा यात पुढाकार महत्वाचा आहे, असे ते पुढे म्हणाले.
यानंतर नवाल यांनी कृषी विभागाच्यावतीने समुद्रपूर तालुक्यात करण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कामाचा आढावा घेतला. पाईकमारी, वाघेडा येथील रोहयोतील विहिरीच्या खोदकामाची पाहणी केली. दहेगाव येथील मशरूम उत्पादक केंद्राला भेट दिली. गिरड येथे मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास प्रक्रिया विभागाची पाहणी केली. शैलेश भिसेकर यांनी मृदा परीक्षण शाळेविषयी माहिती दिली.