क्षयरोग समूळ नष्ट करण्याचा सामूहिक संकल्प

By admin | Published: March 25, 2017 01:14 AM2017-03-25T01:14:49+5:302017-03-25T01:14:49+5:30

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र व अक्षया प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.

Collective resolution to destroy tuberculosis | क्षयरोग समूळ नष्ट करण्याचा सामूहिक संकल्प

क्षयरोग समूळ नष्ट करण्याचा सामूहिक संकल्प

Next

जागतिक क्षयरोग दिन सप्ताहाचा प्रारंभ : जिल्हा क्षयरोग केंद्र व अक्षया प्रकल्पाचा सहभाग
वर्धा : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र व अक्षया प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी क्षयरोग संपविण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. स्वाती पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. धाकटे, एमओडिटीटी डॉ. रेवतकर, गांधी मेमोरियल लेप्रेसी फाऊंडेशन सहसंचालक डॉ. बहुलेकर यांची उपस्थिती होती.
दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असल्यास क्षयरोगाकरिता तपासणी करून लवकर निदान करावे. संपूर्ण उपचार केल्यास क्षयरोग पुर्णपणे बरा होऊ शकतो. क्षयरोग पूर्णपणे बरा होण्याकरिता योग्य औषधोपचार, फॉलोआपकडे सर्व कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे. चांगले आरोग्य घडविण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन प्रमोदकुमार पवार यांनी केले.
प्रभावी औषधोपचार पद्धती व तपासणी तंत्रामुळे क्षयरोग बरा करणे कठीण नाही. रूग्णांनी चिकाटीने औषध नियमित घेणे, डॉक्टराच्या सुचनांचे पालन करणे, व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे. प्रत्येक रूग्णाची तपासणी सुक्ष्म दर्र्शक केंद्रामध्ये झाली पाहिजे. जिल्हास्तरावर उपलब्ध सीबीएनएएटी मशीनमध्ये संशयित एमडीआर रूग्णांची थुंकी तपासणी करणे गरजेचे आहे. अनेकदा रूग्ण दुर्लक्ष करतात. अर्धवट उपचार कोणी सोडणार नाही यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती डॉ. अजय डवले यांनी यावेळी दिली. यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. स्वाती पाटील यांनी केली. यानंतर क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेया नऊ डॉट प्रोव्हायडर (आशा) यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल औषधी निर्माण अधिकारी यांना सुद्धा गौरविण्यात आले.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम राबविले. यात रांगोळी, निबंध व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थिनी सहभागी होत्या. परीक्षण कार्यालय अधीक्षक डगळे, अधिपरिचारिका पुनसे यांनी केले. निवडक रांगोळी तसेच पोस्टरला बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संजीव शेळके यांनी तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मानकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अक्षया प्रोजेक्ट अंतर्गत ताकसांडे व कर्मचारी, जिल्हा सामान्य नर्सिंग स्कूल, वर्धा येथील प्रशिक्षणार्थी, जिल्हा क्षयरोग केंद्र वर्धा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

रॅलीतून केली जनजागृती
क्षयरोग दिन सप्ताहानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र व अक्षया प्रोजेक्ट यांच्यावतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. गांधी मेमोरिअल लेप्रसी फाऊंडेशन येथून रॅलीचा प्रारंभ करून क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. याप्रसंगी डॉ. बहुलेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी, कासाबाई नर्सिंग कॉलेज, गांधी मेमोरिअल लेप्रसी फाऊंडेशन, वर्धा, अक्षया प्रोजेक्टच्या हर्षदा सरोदे, अनिकेत कॉलेज आॅफ सोशल वर्क, डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्क येथील विद्यार्थी तसेच जिल्हा क्षयरोग केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. ही रॅली राम नगर, रेल्वे कॉलनी, राष्ट्रभाषा प्रचार समिती, पँथर चौक, शास्त्री चौक मार्गाने जात समारोप जिल्हा सामान्य रूग्णालय येथे केला.
 

Web Title: Collective resolution to destroy tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.