‘त्या’ बेपत्ता वाघांच्या शोधासाठी प्रहारचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:30 AM2019-03-02T00:30:07+5:302019-03-02T00:35:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पातील शिवाजी नामक वाघ मागील सहा वर्षांपासून बेपत्ता आहे. शिवाय बोरगाव (गोंडी) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पातील शिवाजी नामक वाघ मागील सहा वर्षांपासून बेपत्ता आहे. शिवाय बोरगाव (गोंडी) जंगल शिवारातील वाघाच्या जोडप्यापैकी एक वाघ मागील आठ महिन्यांपासून बेपत्ता आहे. राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पालकत्त्व असलेल्या वर्धा जिल्ह्यातून वाघ बेपत्ता होत असताना वन्यजीव संरक्षण विभाग व वन विभाग दुर्लक्षी धोरण अवलंबत आहे. या दोन्ही वाघांचा शोध घेण्यासाठी संबंधितांना लेखी सूचना करण्यात याव्या. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहारच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
बोर अभयारण्याला बोर व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळण्यापूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात वाघांचे वास्तव्य होतेच. त्यामुळे हे जंगल क्षेत्र वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यावेळी शिवाजी नामक वाघाचे वास्तव्य या आरक्षित जंगलात होते. त्याबाबतचे काही पुरावे संबंधित विभागाकडे आहेत. शिवाय शिवाजी नामक वाघ ट्रॅप कॅमेरातही कैद झाला आहे. परंतु, मागील सहा वर्षांपासून तो बेपत्ता असताना शिवाजी नामक वाघ जीवंत आहे काय, तसेच त्याचे सध्या कुठे वास्तव्य आहे याचा साधा शोधही वन विभाग व वन्यजीव संरक्षण विभागाकडून घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्याचा शोध घेणाºया यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत असून या प्रकरणी जिल्हाधिकारी या नात्याने आपण लक्ष देत सदर दोन्ही वाघांचा शोध घेण्यासाठी संबंधितांना लेखी सूचना कराव्या, अशी मागणी निवेदनातून केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रहारचे विकास दांडगे, नितेश चातुरकर, भुषण येलेकार, शुभम भोयर, रोशन दाभाडे, मयूर ढाले, पवन दंदे, विक्रम येलेकार, वैभव शेंडे, शैलेश कोसे, आदित्य कोकडवार, प्रशील धांदे आदींची उपस्थिती होती.