कार्यरतांचे वाढविले मनोधैर्य; सीएसची केली कान उघाडणी!

By महेश सायखेडे | Published: March 20, 2023 03:18 PM2023-03-20T15:18:21+5:302023-03-20T15:20:49+5:30

संपकाळात जिल्हा रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची 'सरप्राइज विझिट'

Collector's 'surprise visit' to district hospital during employees strike for old pension | कार्यरतांचे वाढविले मनोधैर्य; सीएसची केली कान उघाडणी!

कार्यरतांचे वाढविले मनोधैर्य; सीएसची केली कान उघाडणी!

googlenewsNext

वर्धा : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जिल्ह्यातील कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात आरोग्य यंत्रणेतील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. संपकाळात शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होत त्यांना मनस्ताप सहन करावा लागू नये या हेतूने प्रभावी नियोजन करीत प्रत्यक्ष कृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वीच संबंधितांना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे काय यासह संपकाळातही उत्तम आरोग्य सेवा देणाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले.

जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल एक तासांचा वेळ देत जिल्हा रुग्णालयातील विविध विभागात प्रत्यक्ष जात तेथील आरोग्य सेवेची माहिती जाणून घेतली. शिवाय रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट कशी लावली जातेय हेही पाहणी करून जाणून घेतले. इतकेच नव्हे तर काही रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधला.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी दरम्यान कार्यरत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून आरोग्य सेवेची माहिती जाणून घेताना कार्यरत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. पण काही ठिकाणी ढिलाई दिसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांची कान उघाडणी करीत त्यांना काही मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे याची प्रामुख्याने उपस्थिती होती.

एसडीएमच्या वाहनाने एन्ट्री

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे हे तिन्ही अधिकाऱ्यांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाने जिल्हा रुग्णालय गाठले होते, हे विशेष.

प्रसूती विभागात साधला महिला डॉक्टरांशी संवाद

जिल्हा रुग्णालयावर महिलांचा सर्वाधिक विश्वास आहेच. जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण सुविधेची दररोजची आकडेवारी बारकाईने बघितल्यास ते स्पष्टही होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सेामवारी जिल्हा रुग्णालयाच्या भेटी दरम्यान प्रसूती विभागात प्रत्यक्ष जात तेथील महिला डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नियोजित शस्त्रक्रिया, प्रसूती, गर्भपात आदी विषयांची माहितीही जाणून घेतली.

अस्थिरोग विभागातील शस्त्रक्रियांची जाणली माहिती

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातील अस्थिरोग विभाग गाठून तेथील नियोजित आणि आपात्कालीन शस्त्रक्रिया सुरळीत सुरू आहेत काय याची माहिती कार्यरत डॉक्टरांकडून जाणून घेतली. अस्थिरोग आणि ट्रामा केअर विभागातून संपकाळात दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शिवाय कार्यरत कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप दिली.

शिवभाेजन केंद्राबाबत व्यक्त केली नाराजी

गरजू व गरिबांसाठी सुरू केलेले शिवभाेजन हा राज्य शासनाचा महत्त्वाकांशी उपक्रम आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनाही शिवभोजनाचा लाभ घेता यावा याहेतूने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात शिवभोजन केंद्र देण्यात आले आहे. पण हे केंद्र अडगळीच्या ठिकाणी असल्याने तसेच त्याकडे जबाबदार अधिकारी दुर्लक्षच करीत असल्याचे आकस्मिक भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय काही मार्गदर्शक सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांना दिल्या.

नियोजित प्रत्येक सोनोग्राफी व्हायलाच हवी

जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर महिलांचा सर्वाधिक विश्वास असून तेथे मोठ्या प्रमाणात महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. पण सोनोग्राफीसाठी गरोदर महिलांना तारीख पे तारीख दिली जात असल्याने गरोदर महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोनोग्राफीसाठी अपॉईमेंट देण्यात आलेल्या दिवशीच प्रत्येक गरोदर महिलेची सोनोग्राफी करावी. हयगय नकोच अशी ताकीद यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांना दिली.

ॲक्शन प्लॅन सादर करा

संपकाळात शासकीय रुग्णालयातून प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे. त्यादृष्टीने प्रभावी नियोजन करीत पुढील तीन दिवसांचा ॲक्शन प्लॅन तातडीने सायंकाळपर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेची प्रत्यक्ष संपूर्ण पाहणी केल्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांना दिल्यात.

Web Title: Collector's 'surprise visit' to district hospital during employees strike for old pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.