अस्वलीच्या शोधात वनविभागाचे कोम्बींग आॅपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:50 PM2018-09-01T23:50:29+5:302018-09-01T23:51:48+5:30
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अस्वलीने शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्यास सुरूवात केली. मौजा धाडी येथील शेतकºयांचा जीव गेल्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने जंगलात ट्रॅप कॅमेरे लावून कोम्बींग आॅपरेशन सुरू केले आहे. गेल्या आठवड्याभºयापासून जंगलात ४० वनकर्मचारी ठाण मांडून आहेत.
अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अस्वलीने शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्यास सुरूवात केली. मौजा धाडी येथील शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने जंगलात ट्रॅप कॅमेरे लावून कोम्बींग आॅपरेशन सुरू केले आहे. गेल्या आठवड्याभऱ्यापासून जंगलात ४० वनकर्मचारी ठाण मांडून आहेत. अस्वलीने आपला मुक्काम धाडी मौजा पार करून पार्डीमध्ये हलविल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आष्टी वनपरिक्षेत्रामध्ये माणिकवाडा, धाडी, मोई, या भागात अस्वलीचे वास्तव्य होते. शेतकºयांवर जीवघेणे हल्ले केल्यावर अस्वल प्रकरण शांत झाले; पण दोन महिने लोटताच अस्वलीने पुन्हा पिलांसह परतून धाडी जंगलात मुक्काम ठोकला. जंगलाशेजारील शेतामध्ये अस्वलीचे दर्शन मजूर, शेतकरी तसेच जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या गुराखींना व्हायचे. जनावर चारण्यासाठी नेतात धाडी येथील गुराखी विश्वनाथ राऊत यांच्यावर अस्वलीने हल्ला करून त्यांना गतप्राण केले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी तात्काळ नियोजन करून जंगलात ट्रॅप कॅमेरे लावले. गावागावात बॅनर लावले. आॅडीओ क्लीप तयार करून भ्रमणध्वनीवर व्हॉट्स अॅप माध्यमातून संदेशीत केली. शिवाय दवंडीही देण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना अस्वलीपासून सरंक्षण मिळावे म्हणून संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, सचिव सदस्यांसह वनकर्मचारी व गावकरी यांच्या एकूण नऊ गावात सभा घेतल्या. त्यामध्ये बोरखेडी, थार, पांढुर्णा, धाडी, बोरगाव, झाडगाव, सत्तरपुर, टुमणी, पंचाळा या गावातील शेतकऱ्यांना शेतात जाताना घ्यावयाची काळजी व सावधानता विषयी माहिती देण्यात आली. हातात काठी रॉकेलचे टेंभे, घेवून एकट्याने न जाता तीन चार जणांनी सोबत जाण्याचे सांगितले. धाडीच्या जंगलात कोम्बींग आॅपरेशन सुरू केल्यावर ४० वनकर्मचाऱ्यांनी दररोज सहा कि.मी. याप्रमाणे परिसर पिंजून काढला आहे. घाबरलेल्या अस्वल धाडी जंगल सोडून पार्डी जंगलात पळाली असली तरी पार्डी हे तळेगाव वनविभागांगर्तत असून आष्टीची हद्द लागून आहे. त्यामुळे जंगलात वन विभागाचे कर्मचारी कायम आहेत. अस्वलीने पार्डी येथील प्रभाकर सरोदे यांच्यावर हल्ला केल्याने परिस्थिती आणखी चिघळली. सुहास पाटील यांनी तात्काळ उपाययोजना सुरू केल्या. पण अद्यापही अस्वल हाती लागलेली नाही, हे विशेष.
अस्वलीला खाद्य पाहिजे
अस्वल खाद्य असले त्याच ठिकाणी तग धरते. सध्या हल्ले करीत असलेली अस्वल तिच्या दोन पिलांसह सैरावैरा जंगलात या ठिकाणावरून त्या ठिकाणी पळत आहे. चवताळलेली अस्वल म्हणून तिची वनविभागाने नोंद आहे. अस्वलीला अंमलातासच्या फुल, शेंगा खाद्य पाहिजे, वारूळातील मुंग्या, माकोडे बोर, मोहा, आवडते खाद्य आहे. वनविभागाने जंगलात ठिकठिकाणी मोहा ठेवला आहे. त्यावर कर्मचारी पाळत ठेवून आहेत.