शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 11:55 PM2018-11-09T23:55:40+5:302018-11-09T23:56:13+5:30
शहर व ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासाची हमी केंद्र व राज्य सरकारने दिलेली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देवळी येथे अनेक विकास कामे सुरु असून विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : शहर व ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासाची हमी केंद्र व राज्य सरकारने दिलेली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देवळी येथे अनेक विकास कामे सुरु असून विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
खासदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत शहरातील विविध ठिकाणच्या हायमास्ट लाईटचा शुभारंभ खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुचिता मडावी, प्रमुख पाहुणे न.प. उपाध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र मदनकर, गटनेत्या शोभा तडस, न.प. सभापती सारिका लाकडे, कल्पना ढोक, सुनीता बकाणे, सुनीता ताडाम यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा.तडस म्हणाले की, देवळी शहरामध्ये अत्याधुनिक नाट्यगृह, मिनी स्टेडीयम, आधुनिक बसस्थानक, व्यापारी संकुल, बाजार ओटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व वाचनालय, शाळा व महाविद्यालयाची इमारत, देवळी शहरामध्ये रस्ते व नालींचे कामे, शहीद स्मारक, देवळीचे आराध्यदैवत असलेले मिरननाथ मंदिर परीसराचे सौदर्यीकरण आदी विकासात्मक कामे सुरु आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून रमाई घरकुल योजनेतून गरिबांसाठी घरकुल मंजूर झाले आहे. २०२२ पर्यंत ग्रामीण व शहरामध्ये सर्वांसाठी घरे उपलब्ध होणार आहे. गरीब कुंटीबीयांना हक्काचे घर मिळावे यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देवळीत ८२० घर बांधकामाचे सोपस्कार पूर्णत्वास आले आहे. तसेच ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, अशांसाठी सोनेगांव रोडवरील नगरपालिकेच्या जागेत फ्लॅट सिस्टीम उभारुन पाचशे घरांची वसाहत निर्माण केली जाणार आहे. नकळत सुटलेल्या घरांचा नव्याने सर्वे करुन गरीब कुटुंबीयांना या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. सरकारच्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्या करिता सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खा. तडस यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. नरेंद्र मदनकर तर संचालन नंदकिशोर वैद्य यांनी केले. आभार सारिका लाकडे यांनी मानले. कार्यक्रमाला सदस्य मिलिंद ठाकरे, मारोतराव मरघडे, संध्या कोरोटकर, संगीता तराळे, अब्दुल नईम, हरिदास ढोक, संजय ताडाम, मुरली तपासे, उमेश कामडी, कृष्णा कुर्जेकर व शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.