समिती गठित; पण चौकशीला विलंब
By admin | Published: June 4, 2017 01:01 AM2017-06-04T01:01:02+5:302017-06-04T01:01:02+5:30
गावातील तब्बल २०० लाभार्थ्यांना शौचालय अनुदान रक्कम मिळाली नसल्याची तक्रार होती.
‘लोकमत’ वृत्ताची दखल : अधिकारी गावात फिरकलेच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : गावातील तब्बल २०० लाभार्थ्यांना शौचालय अनुदान रक्कम मिळाली नसल्याची तक्रार होती. यावरून चौकशीसाठी अधिकारी आले असता ग्रामविकास अधिकारी गैरहजर होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच चार सदस्यी चौकशी समिती गठित करण्यात आली; पण ते अधिकारीही अद्याप गावात फिरकले नाही. यामुळे चौकशीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गावात ९४८ लाभार्थ्यांना शौचालय मंजूर करण्यात आले. पैकी ७४४ लाभार्थ्यांचे मंजूर अनुदान ग्रा.पं. कार्यालयात पोहोचले; पण २०० लाभार्थ्यांना रक्कम मिळाली नाही, अशी तक्रार ग्रा.पं. सदस्य सुनील मोहेकर यांनी जि.प. सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी ग्रा.पं. कार्यालयास भेट दिली. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.एस. रेवस्कर हे गैरहजर होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जि.प. वर्धा यांनी स्वच्छ भारत (ग्रा.) अंतर्गत शौचालय अनुदानाची चौकशी करून मौक्का तपासणी करण्यासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तत्सम पत्रही संबंधित अधिकाऱ्यांना दिले; पण अधिकारी गावात आलेच नसल्याची माहिती जि.प. सदस्य अंकिता होले यांनी दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही चौकशी होत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. जि.प. सीईओंनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी जि.प. सदस्य अंकिता होले यांनी केली आहे.
तळेगाव येथील शौचालयांचे अनुदान आले; पण ते २०० वर लाभार्थ्यांना प्रदानच करण्यात आले नाही. याबाबतच्या तक्रारीवरून अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली असता ग्रामविकास अधिकारीच गैरहजर होते. यामुळे चौकशी समिती गठित करण्यात आली; पण चौकशी अधिकारीही अद्याप गावात पोहोचले नाही. यामुळे गैरप्रकाराची चौकशी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.