नुकसानभरपाई द्या, कृषी पंपाची वीज तोडणी थांबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 05:00 AM2022-02-17T05:00:00+5:302022-02-17T05:00:02+5:30
जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशातच गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे पीकही हातचे गेले. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून रब्बीची तयारी चालविली. यादरम्यान अवकाळी पावसाने दणका दिल्याने नुकसानीत आणखी भर पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन-२०२० मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले असून, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. अशा स्थितीत महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची विद्युत जोडणी कापली जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करावी आणि विद्युत जोडणी तोडण्याचे काम थांबवावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशातच गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे पीकही हातचे गेले. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून रब्बीची तयारी चालविली. यादरम्यान अवकाळी पावसाने दणका दिल्याने नुकसानीत आणखी भर पडली. या सर्व नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करून जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे १७८ कोटींची मागणी करण्यात आली. पण, अद्यापही रक्कम प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.एकीकडे शासनाकडे असलेला शेतकऱ्यांच्या हक्काचा मदत निधी दिला जात नाही तर दुसरीकडे पैश्याअभावी विद्युत देयक थकल्याने महावितरणकडून कृषी पंपाची जोडणी कापण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी आता रब्बी हंगामातीलही पीक धोक्यात आले आहे. या अन्याविरुध्द आवाज उठविण्याकरिता भाजपाचे हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी याकरिता खासदार रामदास तडस, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, जि. प. च्या सभापती मृणाल माटे यांनी जिल्हाधिकारी देशभ्रतार यांची भेट घेऊन निवेदन दिले.