एक दिवसाच्या नगराध्यक्षासाठी दुसऱ्या टप्प्यात शनिवारी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:21 PM2018-01-04T22:21:48+5:302018-01-04T22:22:04+5:30
नगर परिषदेच्या कारभाराची माहिती बालपणापासून मिळावी या उद्देशाने नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी एक दिवसाचा बालनगराध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची लेखी परीक्षा नुकतीच पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : नगर परिषदेच्या कारभाराची माहिती बालपणापासून मिळावी या उद्देशाने नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी एक दिवसाचा बालनगराध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची लेखी परीक्षा नुकतीच पार पडली. यात १० शाळेतील ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आता दुसऱ्या टप्प्यात ६ जानेवारी रोजी वक्तृत्व कला चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी दिली.
गांधी विद्यालयाच्या हॉलमध्ये झालेल्या या प्रथम प्रवेश निवड स्पर्धेकरिता येथील मॉडेल हायस्कूल, जिल्हा परिषद कन्या शाळा, आदर्श विद्यालय, कृषक कन्या विद्यालय, तपस्या इंग्लिश स्कूल, निर्मल इंग्लिश स्कूल, कन्नमवार विद्यालय, गांधी विद्यालय, नोबल किडस व कृषक इंग्लिश स्कूलच्या ५ ते १० च्या विद्यार्थ्यांची प्राथमिक स्तरावर चाचणी घेत प्रत्येक शाळेने पाच विद्यार्थ्यांची निवड करून या परीक्षेत सहभाग नोंदविला होता. यातील दोन विद्यार्थी गैरहजर होते. सहभागी ४८ विद्यार्थ्यांनी ५० गुणांची लेखी परीक्षा दिली. त्यांना शनिवारी वक्तृत्व तथा जनसहभागाने होणारी परीक्षा पार करावी लागणार आहे. यात यशस्वितांना एक दिवसाचा बाल नगराध्यक्ष होण्याचा सन्मान प्राप्त होणार आहे. प्रा. सव्वालाखे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या एक दिवसाचा बाल नगराध्यक्ष संकल्पनेची प्रशंसा होत आहे. याद्वारे बालकांनाही न.प. ची माहिती प्राप्त होणार आहे.