पाचवी, आठवीच्या तुकडीप्रकरणी पोलिसांत तक्रार
By admin | Published: July 28, 2016 12:32 AM2016-07-28T00:32:50+5:302016-07-28T00:32:50+5:30
शासनाने तीन किमी परिसरात दुसरी शाळा असल्यास जि.प. शाळांना इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्या सुरू करू नये, असे निर्देश दिले.
मुख्याध्यापक संघाचा पवित्रा : प्रशासनाशी चर्चेनंतर केली जाणार कार्यवाही
देवळी : शासनाने तीन किमी परिसरात दुसरी शाळा असल्यास जि.प. शाळांना इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्या सुरू करू नये, असे निर्देश दिले. असे असताना अडेगाव येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत आठवीची तुकडी सुरू करण्यात आली. याविरूद्ध बोधिसत्व विद्यालय अडेगावचे मुख्याध्यापक मनीष थूल यांनी बुधवारी देवळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
तीन किमी परिसरात दुसरी खासगी वा अन्य कुठली शाळा असल्यास जि.प. शाळांना इयत्ता पाचवी आणि आठवीची तुकडी सुरू करण्याची परवागनी देण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश आहे. असे असताना काही जि.प. शाळांमध्ये तुकड्या वाढविण्यात आल्या. याविरूद्ध वर्धा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांना सोमवारी निवेदन देत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने बुधवारी अडेगाव येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन काळे यांच्या विरूद्ध बोधिसत्व विद्यालय अडेगावचे मुख्याध्यापक मनीष थूल यांनी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीवर तुर्तास कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)