साडी अन् भांडी वाटपाची तक्रार महिलांमध्ये रोष, राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 05:56 PM2024-11-14T17:56:13+5:302024-11-14T17:58:58+5:30

Wardha : भाजप-काँग्रेस उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप

Complaints about distribution of sarees and utensils fueled anger and politics among women | साडी अन् भांडी वाटपाची तक्रार महिलांमध्ये रोष, राजकारण तापले

Complaints about distribution of sarees and utensils fueled anger and politics among women

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांनी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गटाच्या सदस्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती मिशनअंतर्गत काम करणाऱ्या ब्लॉक व्यवस्थापक, क्लस्टर को-ऑर्डिनेटर यांच्यामाध्यमातून विरोधी उमेदवार भांडी, साडी वाटप करीत असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली. यावरून आता चांगलेच राजकारण तापले असून दोन्ही बाजूंकडून वार, प्रतीवार करण्यात येत आहे.


शेखर शेंडे यांनी तक्रारीतून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स महिला बचत गटाच्या सदस्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती मिशनअंतर्गत काम करणाऱ्या ब्लॉक व्यवस्थापक, क्लस्टर को-ऑर्डिनेटर यांच्यामार्फत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दबावात भेटवस्तू वाटप होत असल्याचे तक्रारीत नमूद केले. मात्र, या महिलांनी असा कुठलाही प्रकार होत नसल्याचे सांगितल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. महिलांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा मिळत असल्याने हेतूपुरस्सर आरोप व तक्रार करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, बचत गट सदस्यांनीच ही बाब सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


दरम्यान, तक्रार प्राप्त झाल्याने नोडल अधिकाऱ्यांनी वर्धा व सेलू येथील महिला व बाल कल्याण विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापकांना पत्र देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


दुसरीकडे तक्रारकर्ते आपली तक्रार अंगणवाडी सेविका, आशा वर्कर किंवा बचत गट सदस्यांविरुद्ध नसून, संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध असल्याचे सांगत आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचत गट सदस्यांनीच आपल्याकडे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत तक्रार केली होती, असा त्यांचा दावा आहे. या तक्रारीमुळे सध्या वातावरण चांगलेच तापले आहे.


सत्ताधारी म्हणतात, महिलांमध्ये रोष निर्माण झाला आहे, तर विरोधक म्हणतात, आम्ही महिलांची बाजू घेऊनच तक्रार केली आहे. तसेच अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली आहे. यावरून चांगलेच वादंग सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा वाद राजकीय परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे. या वादात पुढे काय होते, याकडे मतदारांचेही लक्ष लागले आहे.

Web Title: Complaints about distribution of sarees and utensils fueled anger and politics among women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.