सेवाग्राम विकास आराखड्याची कामे वेळीच पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:24 AM2019-01-31T00:24:02+5:302019-01-31T00:24:27+5:30
सेवाग्राम विकास आराखड्यातील प्रत्येक काम हे महात्मा गांधींचा विचार आणि प्रेरणा देणारे असले पाहिजे. त्याचबरोबर कामाची गुणवत्ता आणि दर्जा उत्तम असण्यासोबतच सर्व कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यातील प्रत्येक काम हे महात्मा गांधींचा विचार आणि प्रेरणा देणारे असले पाहिजे. त्याचबरोबर कामाची गुणवत्ता आणि दर्जा उत्तम असण्यासोबतच सर्व कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यात.
सेवाग्राम येथील यात्री निवासच्या सभागृहात सेवाग्राम विकास आराखडा आढावा बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. एन. आर. प्रभू, सेवाग्रामच्या सरपंच रोशना जांबलेकर, पवनारचे सरपंच अजय गांडोळे आदींची उपस्थिती होती.
आराखड्यामध्ये समावेश नसलेली, मात्र करणे आवश्यक आहे अशी कामे जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात यावी. सेवाग्राम गावात केलेल्या कामांची यादी तेथील सरपंच यांना देण्यात यावी. तसेच त्यांना आवश्यक वाटत असेल त्या कामांचा समावेश करावा. सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग यांच्यामुळे कोणतेही काम पूर्ण करण्यास विलंब झाल्यास कारवाई करण्यात येईल, असेही याप्रसंगी ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
मुनगंटीवार प्रार्थनेत झाले सहभागी
राज्याचे वित्त व नियोजन तथा वन मंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम आश्रम येथे आयोजित प्रार्थनेला उपस्थिती दर्शवून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. तसेच त्यांनी आश्रमाची पाहणी केली.