शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 11:58 PM2018-04-22T23:58:48+5:302018-04-22T23:58:48+5:30
शासन केवळ घोषणा करण्यात आणि भूमिपूजन करण्यात व्यस्त असून प्रत्यक्षात कुठेही काम सुरू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना सुरू केली; पण अद्यापपर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासन केवळ घोषणा करण्यात आणि भूमिपूजन करण्यात व्यस्त असून प्रत्यक्षात कुठेही काम सुरू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना सुरू केली; पण अद्यापपर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. देवळी तालुक्यातील हातगाव प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या; पण अद्याप मोबदला नाही. कपाशीवर आलेल्या बोंडअळीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले; पण नुकसान भरपाई नाही. अशा अनेक समस्यांना हात घालत देवळी येथील पंचायत समितीसमोर राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
देवळी तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत; पण लोकप्रतिनिधी या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. भाजप सरकार शेतकरी विरोधी सरकार, अशा घोषणा देत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, कपाशीवर आलेली बोंडअळी व त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने अद्यापपर्यंत नुकसानभरपाई दिलेली नाही. यामुळे त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांच्या दरामध्ये भाव कोसळले आहे. शिवाय मागील चुकारेही अद्याप अप्राप्त आहेत. शासनाने तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी त्वरित सुरू करावी. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये शासकीय चना खरेदी सुरू करावी.
कर्जमाफीचे दीड लाखांवरील लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम भरण्याकरिता सुलभ पाच वर्षांकरिता बिनव्याजी हप्ते पाडून देण्यात यावे. हातगाव प्रकल्पातील देवळी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्यानुसार ताबडतोब मोबदला मिळावा. नवीन पीक कर्जवाटप मिळण्याच्या दृष्टीने कर्जमाफी यादीची घोषणा करून तातडीने अंमलबजावणी करावी. तेलगंणा राज्याच्या धर्तीवर राज्यातही एकरी पाच हजार रुपये अनुदान शेतीकरिता देण्यात यावे. बोगस बी.टी. बियाण्यांपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाकरिता उपाययोजना करावी. गेल्या काही दिवसांत पेट्रोल व डिझेलमध्ये झालेल्या अवाजवी दरवाढीमुळे शेतकरी व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. भविष्यातही इंधनाची दरवाढ होण्याची शक्यता आहे. सातत्याने होणारी ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. आंदोलनात संजय कामनापुरे, संदीप किटे, राहुल घोडे, श्याम देशमुख, संजय बोबडे, बालू पाटील, वानखेडे, प्रदीप निलस्कर, सुनील निमसडकर, अमोल कसनारे, जयंत वाकडे, महादेव भोयर, प्रवीण डांगे, बबन बिरे, मंगेश वानखेडे, गणेश पाचडे, गुणवंत धांदे, सुनील ठाकरे, विनोद ठाकरे, डॉ. विजय राऊत, अशोक देशमुख, गोपाल उगेमुगे, छोटु देशमुख, गोपाल उगेमुगे, प्रशांत डोंगरे यांच्यासह पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.