सेवाग्राम विकास आराखड्यातील कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:43 PM2018-09-22T23:43:26+5:302018-09-22T23:43:57+5:30
सेवाग्राम विकास आराखड्यातील टप्पा १ मधील विकास कामे ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत तसेच सभागृहातील विद्युतीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यातील टप्पा १ मधील विकास कामे ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत तसेच सभागृहातील विद्युतीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल. नव्याने गठीत करण्यात आलेल्या सेवाग्राम विकास आराखडा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. या बैठकीला खासदार रामदास तडस, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी एन प्रभू, सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, अडारकर असोसिएट चे वास्तू विशारद अरुण काळे, नीरा अडारकर, उपभियंता वाय.एम. मंत्री, सेवाग्रामच्या सरपंच रोषणा जामलेकर, पवनारचे सरपंच, राजेश्वर गांडोळे उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या कामामध्ये सभागृहाचे बांधकाम, धाम नदी विकास, पाण्याची टाकी, आवारभिंत, वाहनतळ, आदी कामे ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत ,असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून विद्युतीकरणाचे काम अपूर्ण असल्यामुळे पुढील काम थांबले असल्याचे कार्यकारी अभियंता मंत्री यांनी सांगितले. याबाबत विद्युत विभागाच्या कामाबाबत जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना त्वरित काम पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत.
यावेळी टप्पा २ मधील कामांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये यात्री निवास परिसरात कॉटेज, नयी तालीम अभ्यास केंद्र्र व ग्रंथालय, आश्रम परिसरातील जुन्या घरांचे नूतनीकरण, कस्तुरबा चौक ते सेवाग्राम आश्रम रस्त्याची सुधारणा, सेवाग्राम गावातील पायाभूत सुविधा, गांधी चित्र प्रदर्शनीचे बांधकाम, आदी सर्व कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात यावित असेही नवाल यांनी सांगितले. याशिवाय टप्पा ३ व ४ मधील पवनार येथील इको टुरिझम गार्डन, अण्णा सागर तलाव, संगीतमय कारंजे आणि लेझर शो या कामांबद्दल चर्चा झाली. मुंबई येथील जे. जे. स्कुल आॅफ आर्टतर्फे तयार करण्यात येत असलेल्या जगातील सर्वात उंच चरख्याबाबत अधिव्याख्याता विजय बोनदर आणि विजय सकपाळ यांनी माहिती दिली. हा चरखा सभागृहाच्या समोरील भागात बसविण्यात येणार आहे. याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले. सेवाग्राम विकास आराखड्यातील सर्व चौकांचे सौंदर्यीकरण गांधीमय स्वरूपात करण्यात यावे. तसेच बाहेरून येणाºया पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटनाची माहिती देण्यासाठी ६ ठिकाणी माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्र वर्धेतील बसस्थानक, वर्धा व सेवाग्राम रेल्वेस्थानक, नागपूर रेल्वेस्थानक, आणि नागपूर विमानतळ येथे उभारण्यात येणार आहे. वर्धेत येणाऱ्या सर्व मार्गावर वर्धा आणि सेवाग्रामची माहिती देणारे माहिती फलक उभारण्यात यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी नीरा अडारकर यांना दिल्यात. या बैठकीला वि. वि पांडे, वसीम खान, कार्यकारी अभियंता एस बी काळे, र. ल डाफणे, नगरसेवक निलेश किटे, बांधकाम सभापती शेख नौशाद आदी उपस्थित होते.