दृढ आत्मविश्वासाने समाज परिवर्तन शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:30 AM2019-01-26T00:30:16+5:302019-01-26T00:31:03+5:30
नवसमाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकाच ध्येयाने व एकत्रित प्रयत्नातून कार्य करणे आवश्यक आहे. त्याकरिता वैज्ञानिक दृष्टी, आध्यात्मिक वृत्ती व करूणशीलता जोपासली पाहिजे. साम्ययुगाच्या आधारावर सर्वोदयी समाजाची निर्मिती शक्य आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नवसमाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकाच ध्येयाने व एकत्रित प्रयत्नातून कार्य करणे आवश्यक आहे. त्याकरिता वैज्ञानिक दृष्टी, आध्यात्मिक वृत्ती व करूणशीलता जोपासली पाहिजे. साम्ययुगाच्या आधारावर सर्वोदयी समाजाची निर्मिती शक्य आहे. त्याकरिता आत्मविश्वासाची दृढता अत्यंत आवश्यक असून या दृढतेतूनच नवसमाजाची निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन पवनार आश्रमचे ज्येष्ठ गांधीवादी बाल विजय यांनी केले. गोविंदराम सेकसरिया वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षा मंडळाच्यावतीने आयोजित कल के लिए गांधीवादी पर्याय या विषयावर आयोजित ४५ व्या कमलनयन बजाज स्मृती आंतर विश्वविद्यालयीन परिसंवादात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षा मंडळ वर्धाचे सभापती संजय भार्गव सहसचिव, पुरुषोत्तमदास खेमुका, परीक्षक डॉ. अंजली पाटील, नागपूर, डॉ. सिबी जोसेफ, प्रा. लेखराम दानन्ना परिसंवादाचे समन्वयक प्रा. भरत माने उपस्थित होते.
परिसंवादाची सुरुवात स्व. कमलनयन बजाज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून व जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत व गौरवगीताने झाली. याप्रसंगी बोलताना बाल विजयजी पुढे म्हणाले की याप्रकारचे परिसंवाद ज्ञानवृध्दी करिता अत्यंत आवश्यक ठरतात. तरुणांनी या विषयाला केवळ स्पर्धेपुरतेच मर्यादीत न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणायला हवे.
याप्रसंगी संजय भार्गव म्हणाले की, आज वातावरणातील बदल, गरिबी, हिंसा व शहरीकरण ही आमच्या पुढील आव्हाने आहेत. आजची भांडवलशाही अर्थव्यवस्था लोभाकडे झुकलेली आहे व ती अशीच राहिल्यास समाजावर त्याचा अनिष्ट परिणाम होऊन तो नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आज समाजात नवनिर्मितीची भावना, विश्वास व एकत्रीकरणाची नितांत गरज असून त्याकरिता सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे व त्या आधारेच आपण एका वास्तववादी व आशादायी समाजाची निर्मिती करू शकतो.
याप्रसंगी परिसंवादाचे परीक्षक डॉ. अंजली पाटील, डॉ. सिबी जोसेफ व प्रा. लेखराम दानन्ना यांनी सुध्दा विचार व्यक्त केले. या अखिल भारतीय आंतर विश्वविद्यालयीन परिसंवादात देशाच्या विविध प्रांतातून आलेल्या एकूण ३२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांचे सूतमाला घालून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य डॉ. एन. वाय. खंडाईत यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. भरत माने यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेत्या स्पर्धेकांचा झाला गौरव
परिसंवादाच्या हिंदी माध्यमातून प्रथम पुरस्कार रू. १५ हजार सोनल पटेरिया, भोपाळ, द्वितीय पुरस्कार रू. १० हजार मो. हाशीम, नवी दिल्ली व तृतीय पुरस्कार रू. ७ हजार ५०० संस्कृती चतुर्वेदी, वाराणशी यांना तर इंग्रजी माध्यमात प्रथम पुरस्कार रू. १५ हजार शुभम सुर्या, गांधीनगर, द्वितीय पुरस्कार रू. १० हजार अवंतिका शुक्ला, राजस्थान व तृतीय पुरस्कार रू. ७ हजार ५०० वैभव मेहता, पुणे यांना प्राप्त झाला.