मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरुच राहील
By admin | Published: August 14, 2016 12:25 AM2016-08-14T00:25:51+5:302016-08-14T00:25:51+5:30
ईपीएस १९९५ च्या अल्पपेन्शन धारकांना कोशियारी कमिटीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या व सेवानिवृत्तांना जीवन जगण्यापुरते पेन्शन द्यावे, या मागणीसाठी केंद्र सरकारकडे सतत...
प्रकाश येंडे : सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांचा मेळावा
आर्वी : ईपीएस १९९५ च्या अल्पपेन्शन धारकांना कोशियारी कमिटीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या व सेवानिवृत्तांना जीवन जगण्यापुरते पेन्शन द्यावे, या मागणीसाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला आहे. मागण्या मंजुर होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, संघर्ष सुरुच राहील, असे प्रतिपादन १९९५ राष्ट्रीय समन्वय समिती नई दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी केले.
आर्वी येथील गुरुवारी घेण्यात आलेल्या सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटक आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास अजमिरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रकाश येंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिलीप काळे, माजी आमदार दादाराव केचे, सामाजिक कार्यकर्ते रमेशचंद्र राठी, बाजार समिती संचालक संदीप काळे, रमेशपंत जगताप, प्रकाश पाठक, भिमराव डोंगरे, पुंडलीक पांडे, अशोक राऊत, पी.डी. वानखडे, महम्मद युनुस, दिनकर सोळंके, गंगाधर काळे, शरद पावडे, गजानन निकम, सुनील वाघ, विजय कोकाटे, अशोक देशमुख उपस्थित होते.
याप्रसंगी दिलीप काळे व रामदास अजमिरे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेशचंद्र राठी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले.
येंडे पुढे म्हणाले की, ईपीएस १९९५ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या तुटपुंज्या पगारातून पै-पै कापून स्वत:चा पेन्शन फंड निर्माण केला, परंतु याचा सर्व हिशेब व अधिकार केंद्र सरकारने स्वत:कडे ठेवला. जमा केलेल्या पेन्शन फंडाच्या रकमेतून आज प्रत्येक पेन्शन धारकांना १५ ते २० हजार रुपये पेन्शन म्हणून त्यांच्या जमा रकमेच्या व्याजातून मिळू शकत असतानासुद्धा केंद्र सरकार या अल्पपेन्शन धारकांना फक्त दोनशे रुपये ते दोन हजार रुपये पेन्शन देवून बाकी पैसा हडप करीत आहे. ही पेंशन धारकाची फसवणूक आहे, असा आरोपही त्यांनी केला.
येत्या २१ आॅगस्टला नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयासमोर मोर्चाद्वारे निवेदन तर ७ डिसेंबरला दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मेळाव्याला वर्धा व अमरावती जिल्ह्यातील सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जनार्दन जगताप यांनी केले. संचालन दे.श.धरवार तर आभार गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक बा.दे.हांडे यांनी मानले. राष्ट्रीय समन्वय समिती तालुका शाखा आर्वी, कारंजा, आष्टी येथील संपूर्ण सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)