रोख देण्यास विरोध केल्याने चाकूने भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:07 PM2019-04-14T22:07:26+5:302019-04-14T22:07:47+5:30
धोत्रा शिवारात रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून विश्राती घेत असलेल्या ट्रक चालक रमेशकुमार नरसिंग यादव याची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/हिंगणघाट/अल्लीपूर : धोत्रा शिवारात रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून विश्राती घेत असलेल्या ट्रक चालक रमेशकुमार नरसिंग यादव याची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींना मृत ट्रक चालकाने रोख व इतर मौल्यवान वस्तू देण्यात विरोध केल्याने आरोपींनी त्याच्यावर चाकू हल्ला करून त्याला ठार केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. या प्रकरणातील आरोपी राहूल भीमण्णा पवार (१९) रा. हिंगणघाट याला पोलिसांनी येणोरा पारधी बेड्यावरून अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ट्रकचालक रमेशकुमार यादव याने त्याच्या ताब्यातील ट्रक धोत्रा शिवारातील ढाब्याजवळ उभा करून तो वाहनाच्या कॅबीनमध्ये झोपला होता. रात्री अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने तेथे येत रमेशकुमार याची हत्या करून पळ काढला होता. गुन्हा नोंदविल्यानंतर या प्रकरणाचा तपास स्था.गु.शा.च्या पोलिसांकडे वळता झाला. स्था.गु.शा.च्या पोलिसांनीही आपल्या तपासाला गती देत येणोरा पारधी बेड्यावरून राहूल पवार याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका मिळताच तो बोलका झाला. चोरीच्या उद्देशानेच राहूल पवार व त्याचा साथीदार रघु शास्त्री भोसले हे तेथे आल्याची व रमेशकुमार याची हत्या केल्याची कबुली अटकेतील आरोपीने पोलिसांना दिली आहे. ही कारवाई ्रवरभे, गोल्हर, शर्मा, कांबळे, अवचट, आष्टनकर यांनी केली.
दोन चमू लागल्या होत्या कामाला
सदर प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी स्था.गु.शा.च्या दोन चमू तयार करून प्रत्यक्ष काम करण्यात आले. शिवाय श्वान पथकाच्या तज्ज्ञांकडून मिळालेली माहिती या चमुंना फायद्याची ठरली.
आरोपी राहूल पवार याच्यावर यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्यात हत्येचा तर वर्धा जिल्ह्यातील सावंगी ठाण्यात चोरीचा व हिंगणघाट पोलीस ठाण्यात संशयास्पद हालचाली करीत असल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
मागील काही महिन्यांत ट्रकचालकांना लुटल्या प्रकरणी जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेवाग्राम व वडनेर पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यांसह वर्धा जिल्ह्याशेजारील जिल्ह्यातही आरोपी राहूल पवार याने गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.
ट्रकचालक रमेशकुमार यादव हत्या प्रकरणातील आरोपी राहूल पवार याला अल्लीपूर पोलिसांनी रविवारी हिंगणघाट येथील न्यायालयात हजर करून त्याची बुधवार १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.