15 वर्षे वयोगटातील मुला-मुलीत लसीबाबत संभ्रमावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 05:00 AM2022-01-08T05:00:00+5:302022-01-08T05:00:17+5:30
शिक्षण आणि आरोग्य विभागाने काही बाबी स्पष्ट केल्या नसल्याची शिक्षण क्षेत्रात ओरड आहे. मेंदूज्वर लसीकरण आणि कोविड लसीकरण हे एकाचवेळी आले आहे; मात्र पहिली कोणती लस घ्यावी यात संभ्रमावस्था कुमार-कुमारिकेमध्ये निर्माण झाली आहे. एकाच वेळेस दोन लसी घ्यायच्या की काही ठराविक दिवसांनंतर घ्यायची हे न उलगडणारे कोडे आता विद्यार्थ्यासमोर निर्माण झाले आहे.
राजेश सोळंकी
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : शासन निर्देश आणि आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात शाळेत मेंदूज्वर लसीकरण सुरू झाले आहे. तर याच दरम्यान शासकीय रुग्णालयात १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी केंद्र सरकारचे कोविड लसीकरणही सुरू आहे; मात्र यातील १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यात शंकाकुशंका निर्माण झाली असल्याने लस घ्यावी ? की नाही? हा संभ्रम आहे. शिक्षण आणि आरोग्य विभागाने काही बाबी स्पष्ट केल्या नसल्याची शिक्षण क्षेत्रात ओरड आहे. मेंदूज्वर लसीकरण आणि कोविड लसीकरण हे एकाचवेळी आले आहे; मात्र पहिली कोणती लस घ्यावी यात संभ्रमावस्था कुमार-कुमारिकेमध्ये निर्माण झाली आहे. एकाच वेळेस दोन लसी घ्यायच्या की काही ठराविक दिवसांनंतर घ्यायची हे न उलगडणारे कोडे आता विद्यार्थ्यासमोर निर्माण झाले आहे.
जापनीज एजेफेलिया लसीकरण १ ते १५ वयोगटासाठी शाळेत शिक्षणाधिकारी व आरोग्य विभाग यांच्या आदेशाने सुरू आहे आणि १५ ते १८ वयोगटासाठी कोविड लसीकरणही शासकीय रुग्णालयात सुरू आहे ते करणेही गरजेचे आहे. त्यासाठी याच महिन्यातील कालावधी ३ ते १५ पर्यंत दिला आहे. पंधरा वर्षे वयोगटातील कुमार आणि कुमारिका हे आठव्या-नवव्या वर्गातील आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दोनपैकी कोणती लस पहिली घ्यावी? त्याचे महत्त्व काय! याबाबत काहीच स्पष्ट केले नसल्याने सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत आहेत याबाबत शिक्षण विभागाने निर्देश देणे जरुरीचे आहे.
- सतीश जगताप, जिल्हाध्यक्ष ,मुख्याध्यापक संघ.
विद्यार्थी काय म्हणतात...
मेंदूज्वर लसीकरण आणि कोरोना लस हे एकाचवेळी आलेले आहे. मात्र पहिले कोणते लसीकरण करावे, यात आता आमची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
- कोमल मडामे, इयत्ता नववी.
मेंदूज्वरची लस देणे सर्व शाळेत सुरू आहे आणि सध्या कोरोनाची स्थिती पाहता, कोविड १९ लस घेणे आवश्यक आहे. दोन्ही लसीकरणात किती दिवसाचे अंतर असावे, हे स्पष्ट केले नाही
- रोशन किसन पवार, इयत्ता आठवी.
कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता, १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना लस घेण्याचे आवाहन शासनाने केले आहे आणि शाळेतही शासनाच्या निर्देशाप्रमाणे जापानीज लसीकरण सुरू आहे; पण या लसी दोन्ही एकाचवेळी घ्यायच्या की कसे? त्यामुळे विपरित परिणाम होईल का? यासंदर्भात कोणी काहीही सांगितले नाही
- खुशी सोळंके, इयत्ता नववी.
एकाचवेळी दोन्ही लसी कशा घ्याव्यात? अशी साहजिकच विद्यार्थ्यांना भीती वाटते! ती भीती रास्तही आहे, त्यामुळे एक लस घेतल्यावर अंदाजे आठ दिवसानंतर एक आठवड्यानंतर दुसरी लस घेता येते. आणि पहिली लस कोणती घ्यावी ? मेंदूज्वर की कोविडची ?अशी संभ्रमावस्था विद्यार्थ्यात आहे; परंतु कोणतीही लस पहिली घेतली तर काहीच फरक पडत नाही आणि घाबरायचे कारण नाही. दोनपैकी कोणतीही लस प्रथम घेऊ शकता असे काही बंधन नाही.
- डॉ. मोहन सुटे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी.