'ज्ञानेश्वरी'चे कर्करोगाशी लढा देत 'सीमोल्लंघन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 07:00 AM2020-10-27T07:00:00+5:302020-10-27T07:00:07+5:30

Wardha News Health Cancer तब्बल दहा महिन्यांच्या लढ्यानंतर ज्ञानेश्वरीने कर्करोगावर मात केली असून ती आता सुखरुप घरी पोहोचली. इतकेच नाही तर गुरुजींच्या मार्गदर्शनात तिने पाचवीत प्रवेश मिळवित शैक्षणिक सीमोल्लंघनही केले आहे.

Congratulations! 'Dnyaneshwari' fights cancer | 'ज्ञानेश्वरी'चे कर्करोगाशी लढा देत 'सीमोल्लंघन'

'ज्ञानेश्वरी'चे कर्करोगाशी लढा देत 'सीमोल्लंघन'

Next
ठळक मुद्देमाणुसकी धावून आल्याने आजारावर मातगुरुजणांमुळे पाचवीमध्ये मिळाला प्रवेश


लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: चवथ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या ज्ञानेश्वरी नामक चिमुकलीला रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले. घरातील परिस्थिती जेमतेम असल्याने गुरुजींनी पुढाकार घेत 'मानव सेवा हीच ईश्वर सेवा' समजून मदतीचे आवाहन केले. बघता-बघता माणुसकी धावून आल्याने तब्बल दहा महिन्यांच्या लढ्यानंतर ज्ञानेश्वरीने या आजारावर मात केली असून ती आता सुखरुप घरी पोहोचली. इतकेच नाही तर गुरुजींच्या मार्गदर्शनात तिने पाचवीत प्रवेश मिळवित शैक्षणिक सीमोल्लंघनही केले आहे.

आर्वी तालुक्याच्या कर्माबाद येथे राहणारी ज्ञानेश्वरी धर्मराज टुले ही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चवथ्या वर्गात शिकत असतानाच गेल्यावर्षी तिला रक्ताच्या कर्करोगाने तिला ग्रासले. घरची परिस्थिती बेताची असताना तिच्यावर उपचार करण्यासाठी आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता. अक्षरश: ज्ञानेश्वरी मृत्यूच्या दाढेत उभी होती. तिच्यावर मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यासाठी पैशाची गरज होती. चिमुकलीला आजाराने ग्रासल्याचे कळताच कुटुंबीयांचे बळ हरविले होते. यातच उपचाराकरिता लागणारा खर्च कसा करायचा या विवंचनेत असतानाच शाळेतील शिक्षकांनी मोठे बळ दिले. त्यांनी ज्ञानेश्वरीला या आजारातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्वांना मदतीने आवाहन केले. अल्पावधीत जिल्ह्यातील शिक्षकांनी मदतीचा हात पुढे करुन २ लाख ४७ हजार रुपयांचा निधी उभारला. सोबतच समाजातील दानशुर मंडळी व विविध सामाजिक संघटनांनीही मदत केली. सर्वांचे सदिच्छा आणि प्रार्थना पाठीशी असल्याने ज्ञानेश्वरीने दहा महिन्यांनंतर आजारावर मात करुन मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. ज्ञानेश्वरी आज आपल्यात आहे, याचा सर्वांनाच आनंद झाला असून कुटुंबीयांनी सर्वांचेच आभार मानले आहे.

गुरुजींची धडपड लाख मोलाची
ज्ञानेश्वरीला या आजारातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी तिच्या शाळेतील शिक्षक उमेश दगडकर यांनी सुरुवातीपासून गावचे पोलीस पाटील, गटशिक्षणाधिकारी सतीश काष्टे, केंद्रप्रमुख कोहचाडे यांंच्या सहकार्याने मदतनिधी उभारण्यासाठी धडपड केली. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटांशी निगडीत धर्मदाय संस्था तसेच सर्व शिक्षक यांच्या सहकायार्मुळे चिमुकली आपल्यामध्ये आहे. ती आता आजारातून बाहेर पडली असून तिला नुकताच कृषक कन्या विद्यालयामध्ये पाचवीत प्रवेशही मिळाला आहे.

ज्ञानेश्वरीला या आजारातून बाहेर काढण्याकरिता सर्व शिक्षण विभाग तिच्या पाठीशी उभा झाला होता. शिक्षकांसह विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. उमेश दगडकर या शिक्षकाने पोटच्या मुलीप्रमाणे काळजी घेतली. कोरोना लोकडाऊनच्या काळातील परिस्थिती कुटुंबातील व्यक्तींची परीक्षा बघणारी होती. आज सर्व संकटावर ज्ञानेश्वरीने विजय मिळविला आहे. तिच्या करिता प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.
उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Web Title: Congratulations! 'Dnyaneshwari' fights cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.