काँग्रेसने साजरा केला नोटाबंदीचा द्वितीय स्मृतीदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 08:51 PM2018-11-10T20:51:06+5:302018-11-10T20:51:41+5:30
मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे स्टेट बँक समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शेखर शेंडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करून निषेध करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे स्टेट बँक समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शेखर शेंडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करून निषेध करण्यात आला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुघलकी आदेश काढून नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला व त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. नोटाबंदीमुळे सामान्य जनता व छोटे-मध्यम व्यापारी त्रस्त झाले आहे. नोटाबंदीमुळे बरेच उद्योग बंद पडले. शेकडो कामगार व कर्मचारी बेरोजगार झाले. नवीन उद्योग नावापुरते समोर आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या या नोटाबंदीचा निर्णय पुर्णपणे चुकीचा असून त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले आहे. आज दोन वर्षानंतरही समाजातील प्रत्येक घटक मग तो ज्येष्ठ, तरूण असो किंवा महिला असो हे सर्व आज संकटाचा सामना करीत आहे.
नोटाबंदी हा मोठा कट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुट-बुटातील मित्रांचा काळा पैसा रूपांतरीत करण्याची छुपी योजना होती. सरकारने किती ही लपविण्याचा प्रयत्न केला तरी त्याबद्दलचे सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुढील दिवाळी मोदीमुक्त करावी, असा संकल्प जनतेनी घ्यावा, असे आवाहन शेखर शेंडे यांनी केले.
आंदोलनात माजी सचिव प्रवीण हिवरे, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेंद्र शर्मा, इकराम हुसैन, वर्धा जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गौरव देशमुख, नगरसेवक निलेश खोंड, परवेज खान, दिनेश पाटील, निळकंठ पिसे, फिरोज खान, पंकज काकडे, गुड्डू तेलरांधे, अर्शी मलिक, नितीन इंगळे, जिल्हा महासचिव आबिद शेख, वर्धा विधानसभा अध्यक्ष कुणाल भाकरे, एन.एस.यु.आय. जिल्हा उपाध्यक्ष वैभव तेलरांधे, पल्लवी खामणकर, मंगेश काळे, आदित्य खुणकर, राहुल मेहेर, निखिल देशमुख, रवी कडू, चेतन कडू, विपीन सोनोने आदी काँग्रेस व युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.