जातीची साथ मिळेल हाच आत्मविश्वास काँग्रेसला नडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:32 PM2019-05-24T22:32:25+5:302019-05-24T22:33:25+5:30

लोकसभेच्या निवडणूक निकालाने आर्वी विधानसभा क्षेत्रात अनेकांना धक्का बसला आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस पक्षाचे आमदार आहे. कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला, असे चित्र दिसून येत आहे. जातीच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न आर्वी विधानसभा क्षेत्रात कॉँग्रेसकडून करण्यात आला.

Congress got confidence from the support of caste | जातीची साथ मिळेल हाच आत्मविश्वास काँग्रेसला नडला

जातीची साथ मिळेल हाच आत्मविश्वास काँग्रेसला नडला

Next

लोकसभेच्या निवडणूक निकालाने आर्वी विधानसभा क्षेत्रात अनेकांना धक्का बसला आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस पक्षाचे आमदार आहे. कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला, असे चित्र दिसून येत आहे. जातीच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न आर्वी विधानसभा क्षेत्रात कॉँग्रेसकडून करण्यात आला. मात्र, मतदारांनी कॉँग्रेसचा हा प्रयत्न हाणून पाडत रामदास तडस यांच्या बाजूने स्पष्ट कौल दिला.
रामदास तडस यांचा असलेला जनसंपर्क याला कारणीभूत ठरला. आर्वी विधानसभा मतदारसंघात दादाराव केचे यांनी २००९ पासून या मतदारसंघात गावपातळीवर भाजपची संघटनबांधणी चांगल्या पद्धतीने केली आहे. सातत्याने जनहिताचे प्रश्न लावून धरून ते सोडविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जाते. रामदास तडस यांनी २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर या भागात सातत्याने आपला संपर्क ठेवला व लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. या सोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर दिवे, शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख अंनत गुढे, भाजप-सेनेचे कार्यकर्ते यांनी निवडणूक काळात प्रचंड परिश्रम घेतले. मतदार राजासमोर जाऊन सातत्याने आपल्या पक्षाची भूमिका मांडली. आर्वी मतदारसंघात सध्या कॉँग्रेसचे विद्यमान आमदार आहे. या मतदार संघात जातीचे कार्ड चालवून दोन समाजात दुही निर्माण करण्याचे काम करण्यात आले. मात्र, जनतेने सहजपणे उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधीच हवा, ही भूमिका मांडत तडस यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळेच आर्वी विधानसभा क्षेत्रात भाजपला २६ हजार २३७ मतांची आघाडी मिळविता आली. रामदास तडस यांना ९१ हजार ६५ तर चारूलता टोकस यांना ६४ हजार ८२८ मते मिळाली. कॉँग्रेसचे आमदार असूनही या मतदारसंघात मोदी लाटेत कॉँग्रेसला मताधिक्य मिळविता आले नाही. भाजप सरकारच्या काळात विविध प्रश्न मार्गी लागलेत. यामध्ये दिवे, केचे यांच्यासह सुमित वानखेडे यांचेही योगदान आहे. जनतेने दिलेला कौल विकासाचा असल्याचे दिसते. या मतदार संघात काँग्रेसचे आमदार असले तरी समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांची संख्या माजी आमदार दादाराव केचे यांच्याकडेच अधिक आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्याने दादाराव केचे विद्यमान आमदारांच्या तोडीचेच काम करताना दिसत आहे. वेळप्रसंगी खासदारांना घेऊन वा परस्परही मुख्यमंत्र्यांना गाठून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची हातोटी ही भाजपाच्या जनसंपर्काची सगळ्यात जमेची बाजू आहे. दुसरीकडे पक्ष पातळीवरच सुधीर दिवे यांनी वाढविलेला प्रचंड जनसंपर्क, गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपाचा फडकलेला झेंडा या बाबीही लोकसभेच्या मताधिक्यासाठी कारणीभूत ठरल्या. कारंजाचा उड्डाणपूल, संत्रा उत्पादकांना मिळालेला दिलासा याचाही फायदा झाला.
भाजपचे पारडे जडच राहील
लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदार संघात भाजपला २६ हजारांची आघाडी मिळाली. त्यामुळे पुढील निवडणुकीत भाजपचे पारडे जडच राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आर्वी येथील जाहीर सभेत दादाराव केचे यांना उमेदवारी देण्याबाबत जाहीर सूतोवाच केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावलेला आहे. भाजपला मिळालेल्या या यशात कुणबी, तेली, माळी या सर्व समाज घटकांचे योगदान आहे. कॉँग्रेसचे आमदार असूनही पक्षाला येथे मोठे मताधिक्य मिळविता आले नाही. यातच विद्यमान आमदारांचे अपयश अधोरेखित होणारे आहे. यावर कॉँग्रेसने चिंतन करण्याची गरज आहे. आता लोकांना रस्त्यावर भेटणारा माणूस हवा आहे. घरी बसून काम करणाऱ्यांची मतदारांनी रवानगी केली.

Web Title: Congress got confidence from the support of caste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.