निवडणुकीच्या तोंडावर काँगे्रसला राजकीय हादरे
By admin | Published: January 25, 2017 12:56 AM2017-01-25T00:56:51+5:302017-01-25T00:56:51+5:30
जि.प., पं.स. निवडणुकीची रंगत दिवसागणिक वाढत आहे. राजकीय पक्षांकडून सक्षम उमेदवारांचा शोध घेताना
दोन माजी सभापती भाजपात : नागपुरात केला पक्ष प्रवेश
वर्धा : जि.प., पं.स. निवडणुकीची रंगत दिवसागणिक वाढत आहे. राजकीय पक्षांकडून सक्षम उमेदवारांचा शोध घेताना मुलाखती आटोपल्या जात असतानाच पक्षांतर करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जि.प. च्या माजी शिक्षण सभापती व विद्यमान सदस्य उषाकिरण थुटे, एकेकाळचे काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण उरकांदे, जि.प. च्या माजी महिला बालकल्याण सभापती मेघा उरकांदे यांनी भाजपाची वाट धरली आहे. तीनही स्थानिक बड्या नेत्यांचे अधिकृत प्रवेश झाल्याने काँग्रेसला राजकीय हादरे बसले आहेत.
नगर परिषदेच्या निवडणुका असताना अनेक काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षांना रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरही तेच घडत आहे. काँगे्रसकडून उमेदवारी नाकारली जाण्याच्या तसेच विजयाची खात्री नसल्याच्या धास्तीने पक्ष सोडणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
समुद्रपूर येथून जिल्हा परिषद सदस्यपद काबीज करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या प्रा. उषाकिरण थुटे यांनी काँगे्रसला दूर सारून भाजपाला जवळ केले आहे. थुटे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या सोबतच काँगे्रसचे माजी नगरसेवक राजू अवचट, मनसेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रागिनी शेंडे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
तत्पूर्वी, आ. रणजीत कांबळे यांच्या गोटाचे व त्यांच्या पुढाकारामुळे काँगे्रसचे जिल्हाध्यक्षपद मिळालेले प्रा. किरण उरकांदे यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांनीही भाजपाची वाट धरली असून अधिकृत प्रवेश केला. शिवाय त्यांच्या पत्नी व काँगे्रसच्या माजी महिला व बालकल्याण सभापती राहिलेल्या मेघा उरकांदे यादेखील भाजपावासी झाल्या आहे.
निवडणुकीच्या तोंडावर असताना त्या-त्या क्षेत्रात वजन असलेल्या तीन बड्या स्थानिक नेत्यांनी पक्ष सोडल्याने काँगे्रसला हादरा बसला आहे. प्रा. किरण उरकांदे या तळेगाव (टा.) जि.प. गटासाठी भाजपची उमेदवारी मागत आहे. यामुळे पक्षाकडे आशा ठेवून असलेले तळेगाव (टा.)गटात भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आशेवर उरकांदे यांच्या पक्षप्रवेशाने पाणी फेरले जाते काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.जिल्ह्यात पक्षांतर करणाऱ्यांमध्ये मोठ्या नावांचाच समावेश होत असल्याने काँगे्रसच्या खेम्यातील चिंता मात्र वाढताना दिसत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)