काँग्रेस देशात टुकडे टुकडे गँग अन् अर्बन नक्षलवाद चालवत आहे; वर्धा येथे PM मोदींचा घणाघात
By रवींद्र चांदेकर | Published: September 20, 2024 10:39 PM2024-09-20T22:39:56+5:302024-09-20T22:51:16+5:30
ही महात्मा गांधी यांची काँग्रेस असूच शकत नाही, असेही मोदी म्हणाले.
वर्धा: विरोधकांची भाषा, बोली, परदेशात देशविरोधी वक्तव्य, देश तोडण्याची भाषा, संस्कृती आणि आस्थांचा अपमान करणे, ही विरोधकांची प्रवृत्ती आहे. काँग्रेस देशात टुकडे टुकडे गँग आणि अर्बन नक्षलवाद फोफावू इच्छिते, असा घणाघात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केला.
वर्धा येथील स्वावलंबी मैदानात शुक्रवारी पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळा पार पडला. आपल्या ३१ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यातून त्यांनी देश एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ली काँग्रेसचे तुष्टीकरणाचे भूत जागे झाले असून, कर्नाटकात त्यांनी चक्क गणपती बाप्पालाच पिंजऱ्यात कैद केल्याचे ते म्हणाले.
"ही महात्मा गांधी यांची काँग्रेस असूच शकत नाही. काँग्रेसचे नेते परदेशात जाऊन देशविरोधी अजेंडा चालवितात. मात्र, आम्हाला परंपरा, संस्कृती, सन्मान, विकासासोबत एकत्र व्हायचे आहे. महात्मा गांधी यांनी ग्रामीण विकासासाठी कुटीर उद्योगाचा मंत्र दिला. मात्र, देशावर ७० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या विचारांना तिलांजली दिली. परिणामी ग्रामीण उद्योग उद्ध्वस्त झाले. मात्र, एनडीए सरकाने पीएम कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून पारंपारिक लघुउद्योग आणि ग्रामीण कारागिरांना सन्मान देण्याचे काम केले आहे. आता एकत्रितपणे देशाचा गौरव वाढवू या", असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंचावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जितनराम मांझी, जयंत चौधरी, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ना. चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी खासदार रामदास तडस आदींची उपस्थिती होती.
१४ लाख कारागिरांना योजनेचा लाभ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएम विश्वकर्मा योजनेचा राज्यातील १४ लाख ७२ हजार कारागिरांना लाभ मिळाल्याचे यावेळी सांगितले. ‘लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो’, अशी त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी राज्यातील सहा कोटी महिला आत्मनिर्भर झाल्याचे सांगितले. वन नेशन, वन इलेक्शन निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. कुणी कितीही प्रयत्न केला तरी देशातील आरक्षण संपवू शकत नसल्याचेही ते म्हणाले.