स्थळ निश्चितीसाठी काँग्रेसच्या दिग्गजांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:08 PM2018-09-24T23:08:31+5:302018-09-24T23:09:15+5:30

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने वर्धेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी यांची उपस्थिती राहणार असून सोनिया गांधी या देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकूण चार कार्यक्रम वर्धा व सेवाग्राम येथे करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Congress veterans tired of spot fixing | स्थळ निश्चितीसाठी काँग्रेसच्या दिग्गजांची दमछाक

स्थळ निश्चितीसाठी काँग्रेसच्या दिग्गजांची दमछाक

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी व एसपी यांच्याशी चर्चा : कार्यकारिणी बैठकीसह वर्ध्यात जाहीर सभा होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने वर्धेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी यांची उपस्थिती राहणार असून सोनिया गांधी या देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकूण चार कार्यक्रम वर्धा व सेवाग्राम येथे करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांच्या स्थळ निश्चितीकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व अखिल भारतीय कॉग्रेसचे महासचिव अशोक गहलोत यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत वर्धा व सेवाग्राम परिसर पिंजून काढला; पण कुठल्या स्थळी कुठला कार्यक्रम होईल यावर अधिकृतपणे काँग्रेसच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले नाही.
स्थानिक विश्रामगृहात सोमवारी दुपारी १२.१५ वाजता पोहोचलेल्या खा.अशोक चव्हाण व अशोक गहलोत यांच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम काही निवडक काँगे्रस नेत्यांशी चर्चा केली. ही चर्चा विश्रामगृहातील ‘शिशिर’ या दालनात दुपारी १२.४० पर्यंत चालली. त्यानंतर सदर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची त्यांच्या कार्यालयातील सभागृहात भेट घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी १२.५५ वाजता सुरू झालेल्या बैठकीचा समारोप दुपारी १.२० वाजता झाला. या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्यावतीने २ आॅक्टोंबरला आयोजित करण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक, बापुकुटी परिसरात प्रार्थना,पदयात्रा व जाहीर सभा या विषयी चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून सेवाग्राम आश्रम परिसर व वर्धा शहरातील काही स्थळांची पाहणी करण्यात आली. हा स्थळ पाहणीचा कार्यक्रम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होता. शिवाय सुरूवातीला कुठल्या-कुठल्या कार्यक्रमासाठी कोणती- कोणती जागा निश्चित केली याची अधिकृत माहिती पक्षांच्यावतीने देण्यात आली नाही. एकूणच जागा निश्चितीसाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह दिग्गजांची चांगलीच दमछाक झाली होती.
सोनिया गांधी व राहुल गांधी येणार
काँग्रेसच्यावतीने आयोजित काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक ,प्रार्थना, जाहीर सभा, पदयात्रा या कार्यक्रमांसाठी काँगे्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष वर्धेत येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. इतकेच नव्हे तर सोनिया गांधी याही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याबाबत जिल्ह्यातील गुप्तचर विभागाकडून सध्या दुजोरा दिला जात आहे.
दोन कार्यक्रम वर्धेत तर दोन सेवाग्रामात?
काँग्रेसच्यावतीने आयोजित बापुकुटीत प्रार्थना, काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक,जाहीर सभा, पदयात्रा या कार्यक्रमांपैकी जाहीर सभा व पदयात्रा हा कार्यक्रम वर्धा शहरात तर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक सेवाग्राम परिसरात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी त्याबाबत अद्यापही अधिकृत दुजोरा मिळाला नाही. जाहीर सभेसाठी सर्कस ग्रांऊडला पंसती दिली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
गांधी पुतळा परिसरातून निघणार पदयात्रा
२ आॅक्टोबरला आयोजित पदयात्रेची सुरूवात सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरातून होऊन ही पदयात्रा वर्धा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर रामनगर भागातील सर्कस मैदानावर पोहोचण्याची शक्यता आहे. शिवाय याच मैदानावर जाहीर सभा पार पडेल. या पदयात्रेत सुमारे ३० हजार नागरिक सहभागी होण्याची तर जाहीर सभेला सुमारे ४०-५० हजार नागरिक उपस्थित राहण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नियोजन स्थानिक नेत्यांना करावयास सांगितल्याचे समजते.
१३ जणांची जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.एन. प्रभु, आश्रम प्रतिष्ठानचे भावेश चव्हाण यांच्यासह एकूण सुमारे १३ मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी सुमारे २५ मिनीटे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Congress veterans tired of spot fixing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.